पुण्यात बेडसाठी तीन तास वणवण फिरणाऱ्या कोरोना रूग्णावर नारायणगावात यशस्वी उपचार

नारायणगाव (किरण वाजगे)-शरीरातील ऑक्सिजन ची लेव्हल ३५ वर पोहोचली असताना अचानक सिरीयस झालेल्या कोरोना बाधित रुग्णाला तातडीने पुण्याला हलविण्याचा निर्णय झाला.

तीन तास पुणे व पिंपरी चिंचवड येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी वणवण फिरून देखील कुठेही बेड शिल्लक नसल्यामुळे अखेर या रूग्णाला पुन्हा पुण्याहून नारायणगावला नव्याने सुरू करण्यात आलेल्या एका खाजगी कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे पंधरा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर हा रुग्ण चक्क स्वतःच्या पायावर चालत घरी आला ही घटना नुकतीच नारायणगाव येथे घडली आहे.

 या आनंददायी घटने मुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी या रुग्णांचे फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांची उधळण व औक्षण करत शुक्रवारी (दि.१८) रोजी जंगी स्वागत केले.

नारायणगावातील बाळासाहेब दळवी या ४६ वर्षीय युवकाच्या बाबतीत हा प्रसंग ओढवला.येथील मॅक्स केअर या रुग्णालयांमध्ये डॉ प्रतीक पाटील, डॉ धनंजय कोऱ्हाळे व त्यांच्या टीमने या रुग्णांवर यशस्वी उपचार केले.

हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, श्रीमंत लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसाबे, सतीश दळवी, ग्रामपंचायत सदस्य अनिल दिवटे, पिंटू दिवटे, संजय कसाबे, तुषार दिवटे, सोमनाथ दळवी निलेश गोरडे आदींनी रुग्ण बाळासाहेब दळवी यांचे उत्साहात स्वागत केले.

Previous articleदेऊळगाव राजे मध्ये कृषिदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Next articleकॅशक्रेडीट कर्जयोजना व पगार बँकेत जमा होणाऱ्या खातेदारांनासाठी विमा योजना लागू करा