जुन्नर तालुक्यात चंदन चोराला मुद्देमालासह अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये व परिसरात चंदन लाकडाची चोरी करणाऱ्या तसेच वाहतूक करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नुकतीच अटक केली.जुन्नर तालुक्यातील कुसुर गावाच्या हद्दीतील तलाखी येथील ठाकरवाडीत एक इसम चंदन चोरी करत असुन त्याने त्याच्या घराच्या शेजारील पत्रा शेड मध्ये चंदनाची लाकडे लपवुन ठेवली असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाल्या नंतर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या व्यक्तीच्या घराजवळील पत्रा शेड मध्ये छापा टाकला व मुद्देमाल हस्तगत करून त्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला पुढील तपासासाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

          या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव दशरथ सोनबा मोधे (वय- ४२ वर्षे, रा. तलाखी-कुसुर ,ता. जुन्नर, जि. पुणे) असे आहे.

       स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार (दि. १८) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना ख बऱ्याकडून माहिती मिळाली की जे कुसुर गावच्या हद्दीतील ठाकर वाडीत दशरथ सोनबा मोधे हा चंदन चोरी करत असुन त्याने त्याच्या घराच्या शेजारील पत्रा शेड मध्ये चंदनाची लाकडे लपवुन ठेवली आहेत.

मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष दशरथ मोधे याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा घातला असता तिथे पाहणी केल्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पोत्यात चंदनाच्या लाकडाच्या गाभ्याच्या ढपल्या, एक लोखंडी कुऱ्हाड, एक वाकस, एक गिरमिट, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी कोयता असा २७५५ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचांसमक्ष जप्त केला आहे.

सदर गुन्ह्याबाबत आरोपीवर जुन्नर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४८३/२०२० भा. दं.वि.कायदा कलम ३७९, भारतीय वन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, पोलीस हवालदार शरद बाबळे, पोलीस नाईक दीपक साबळे यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleमाझा प्रभाग माझी जबाबदारी” या अनुषंगाने नागरिकांना नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी घरोघरी केले स्टिम मशीनचे मोफत वाटप
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम