खरपुडी बु. गावातील दत्त नगर ते मांडवळा रस्त्याची दुर्दशा

Ad 1

राजगुरूनगर– खरपुडी बु. गावातून जाणाऱ्या दत्त नगर ते मांडवळा रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वस्तीवरील सर्व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. कच्या रस्त्यावरील मोठ्या खड्यांमध्ये अनेक दुचाकीचे अपघात होत आहेत. दत्त नगर (चिरकडी वस्ती) रहिवाश्यांना गावाशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्यांना हा त्रास सहन करावा लागतो.

गेली अनेक वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. निवडणुका तोंडावर आल्या की आश्वासने देणारे सर्व लोक प्रतिनीधी इकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मोठ्या थाटात या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन झाले होते. तसे बॅनर ही जागोजागी लागले होते.तसेच गावातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण झालेले असताना या 2 किमी अंतरावर साधा मुरूम टाकण्याची तसदी ही ग्राम पंचायत घ्यायला तयार नाही. तरी या रस्त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी असं वस्तीवरील सर्व ग्रामस्थांच म्हणणं आहे.