” माझे कुटूंब – माझी जबाबदारी “या मोहिमेच्या अंतर्गत घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी -आमदार दिलीप मोहिते-पाटील

 

राजगुरूनगर-पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र व ग्रामीण , निमशहरांचे क्षेत्र अशी वैविध्यपूर्ण रचना असणाऱ्या खेड तालुक्यात कोरोना विषाणूने मोठे भयाण रूप धारण केल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनारुग्ण संख्येत व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत आहे. या स्थितीला नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनातून महाराष्ट्र मुक्त करण्याच्या व्यापक उद्देशाने ” माझे कुटूंब – माझी जबाबदारी ” ही मोहिम सुरु करुन आरोग्यमय महाराष्ट्राची साद घातली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत खेड तालुक्यात प्रशासनाने तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीवर , घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या घेण्याचे उद्दिष्टय ठेवले आहे.

खेड तालुक्यात 18 व 19 सप्टेंबर या दोन दिवसांत प्रत्येक घरात जाऊन आरोग्ययंत्रणेचे कर्मचारी , आरोग्यसेवक प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी व आरोग्य तपासणी करणार आहेत. सर्वांनी शासनाच्या या मोहिमेला सहकार्य करुन स्वतःची व परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.

कुटूंबाच्या व सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आपण आपला खेड तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आपली आरोग्यविषयक सत्य माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन कोरोना रोखण्यात सहकार्य केले पाहिजे. या मोहिमेसाठी तालुक्यात प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न व उपाययोजना सुरु केल्या आहेत. या मोहिमेत अधिकाधिक आरोग्य तपासण्या तत्परतेने व्हाव्यात म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण खेड तालुक्यात दि. 18 व 19 सप्टेंबर या दोन दिवशी जनता कर्फ्युची हाक विविध समाजसेवी संस्था व प्रशासनाने दिली आहे.

Previous articleखेड तालुक्यात घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी-आमदार दिलीपराव मोहिते
Next articleकोरोना सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ चाकण च्या वतीने ऑक्सिमीटर ,थर्मामीटर ,सेंनिटायर ,मास्क, इत्यादी साहित्य नगर परिषदेकडे सुपूर्त