रायरेश्वर आणि रोहीडा किल्ल्यांच्या प्रलंबित कामांच्या संदर्भात पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

अमोल भोसले , उरुळी कांचन

बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र कंधारे, बारामती लोकसभेचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी कामांच्या संदर्भात तटकरे यांना दिले निवेदन. रायरेश्वर आणि रोहीडा या किल्ल्यांच्या सुविधांकरिता निधी मंजूर झाला होता. परंतु अधिकऱ्यांनी सुचविलेली कामे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीमध्ये तफावत असल्याने या कामाच्या फेरनिविदा काढण्या संदर्भात विनंती केली होती. ही कामे पर्यटन विकास महामंडळाकडे गेली दोन वर्षे प्रलंबित आहेत.

जेजुरी देवस्थानचा विकास आराखडा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला असून त्यास मंजुरी मिळावी. तसेच हवेली तालुक्यातील वडकी येथे असलेल्या ऐतिहासिक मस्तानी तलावाचे सुशोभीकरण करुन पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची तरतूद करावी. भोर तालुक्यातील भाटघर, नीरा देवघर, वेल्हे तालुक्यातील पानशेत, गुंजवणी, मुळशी तालुक्यातील टेमघर, वरसगाव, मुळशी आणि हवेली तालुक्यातील खडकवासला या बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व धरण परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा, अशी मागणीही या पत्राद्वारे केली आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड हा किल्ला पुणे शहरापासून सगळ्यात जवळ आहे. ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि शहरापासून जवळ असल्याने या किल्ल्यावर दररोज हजारो शिवप्रेमी येत असतात. या शिवप्रेमींसाठी तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी गडाच्या पायथ्याशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

Previous articleवाघोलीत फुटपाथचे खोदकाम नागरिकांमध्ये असंतोष
Next articleकोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आपल्या हातात-सुनील महाडिक