अभिनेते कुमार पाटोळे यांच्या उपोषणाला महाकला मंडलाचा पाठिंबा

अमोल भोसले, पुणे

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेली सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकार दरबारी कलाकारांचा आवाज पोहचावा, या साठी अभिनेते कुमार बाळकृष्ण पाटोळे यांनी १६ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

महा कला मंडल या राज्यव्यापी शिखर संघटनेच्या वतीने
मंडलाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया हे सुद्धा पाटोळे यांचे सोबत पहिल्या दिवशी चक्री उपोषणाला बसून पाठिंबा देणार आहेत. नाटक, चित्रपट, शाहिरी, लोककला, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकारांना कोरोनाच्या संकटाचा आर्थिक फटका बसल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. कलाकारांची कर्मभूमी असलेले बालगंधर्व रंगमंदिर येथे उपोषण होणार आहे.

कलाकारांसाठी महामंडळ स्थापन करावे, आरोग्यविम्याचा प्रश्न सोडवावा, प्रवास खर्चात सूट द्यावी, घरकुल योजना राबवावी, कलाकारांची शासनदरबारी नोंदणी करावी, कलाकारांना नोकरी, वृद्ध कलाकारांना निवारा, पेन्शन द्यावी. अशा महा कला मंडलाच्या मागण्या आहेत. सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी ही प्रमुख मागणी आहे. या चक्री उपोषणात महाकला मंडलाचे अनेक कलाकार
महाकला मंडल अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महाकला मंडल कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया सहभागी होणार आहेत, अशी माहिती अभिनेते कुमार पाटोळे यांनी दिली.

Previous articleखेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदी सतिश गुरव यांची नियुक्ती
Next articleकुरवंडी येथे “विकेल ते पिकेल” कार्यक्रम संपन्न