हडपसरचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांंचे खा.डॉ. अमोल कोल्हे यांना आश्वासन

अमोल भोसले- पुणे

हडपसर परिसराचा पाणी पुरवठा येत्या १६ सप्टेंबरपासून सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांना दिले..

हडपसर परिसरातील अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने येत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी आज रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीची पाहणी केली. त्यावेळी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर व अन्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. सातत्याने अपुरा व अनियमित पाणी पुरवठा हा हडपसरच्या नागरिकांवर अन्याय असून एका बाजूला मध्य पुण्यातील पेठांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत असताना हडपसर परिसरात ४-५ तास पुरेशा दाबाने पाणी का पुरवले जात नाही असा सवाल करुन डॉ.अमोल कोल्हे यांनी याबाबत प्रशासन काय नियोजन करणार आहे अशी विचारणा केली.

यावेळी आमदार चेतन तुपे व हडपसरच्या नगरसेवकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी हडपसरसाठी सध्या कमी मिळणारे ४० एमएलडी पाणी कसे उपलब्ध करुन देणार व नागरिकांना पुरेशा दाबाने कधीपासून पाणी मिळेल याचा निश्चित प्लान आपण सांगा असा आग्रह धरला. त्यानंतर विभागप्रमुख पावसकर यांनी १८ सप्टेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिले. १६ सप्टेंबरपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आपण पुन्हा आढावा घेणार असल्याचे यावेळी डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

Previous articleसाठवण बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी
Next articleमाहेर संस्थेच्या ‘वात्सल्यधाम’ प्रकल्पात गणेशोत्सव उत्साहात साजरा