तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम प्रगतीपथावर खा.डॉ. अमोल कोल्हे

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारीत अलाईन्मेटची आखणीबाबत येथल्या संसद अधिवेशन काळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र तळेगाव शहरात भूसंपादनात अडचणी येत आहेत. त्यामुळे तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या रस्त्याचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी आज खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, श्री. कोतवाल व डीपीआर तयार करणाऱ्या कन्सल्टन्ट लायन इंजिनिअरिंगचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या पर्यायी रस्त्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार पीएमआरडीएच्या रिंगरोडच्या मार्गाने खेड तालुका हद्दीला जोडण्याच्या पर्यायाचा विचार करून नवीन अलाईन्मेट तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनिल शेळके यांनी दिल्या. या संदर्भात पीएमआरडीएशी समन्वय साधून सर्व्हेक्षण करुन दोन आठवड्यात नवीन अलाईन्मेट तयार करण्याचे काम पूर्ण करा. १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात संसद अधिवेशन आहे. त्यावेळी आपण व आमदार शेळके या संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावू असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleसुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या कॕश बॕरीयरचे नुकसान
Next articleव्हाँट्सअप ग्रुप वरील आवाहनातून व्हेंटिलेटरसाठी भरघोस मदत