कोरोना बाधित पत्रकारांसाठी शासकीय आणि धर्मदाय, खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करण्याची मराठी पत्रकार परीषदेची मागणी

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन- प्रतिनिधी

कोरोना बाधित पत्रकारांसाठी राज्यात शासकीय आणि धर्मदाय, खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेने मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्रे पाठवून केली आहे.

राज्यात दीडशेच्या वरती पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील बहुतेकजण बरे होऊन घरी गेले असले तरी किमान 11 पत्रकार कोरोना विरोधातली लढाई हरले आहेत. आजही किमान 50 पत्रकार विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र पत्रकारांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या सातत्यानं तक़ारी येत आहेत. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचंही योग्य उपचार न मिळाल्यानं निधन झाल्यांची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. त्यांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था तसेच ऑक्सिजनही न मिळाल्यामुळे एका तरूण आणि उमद्या पत्रकाराचं निधन झाले, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये, म्हणून पत्रकारांसाठी राखीव खाटा ठेवाव्यात, अशी मराठी पत्रकार परिषदेची आग्रही मागणी आहे. कृपया या मागणीचा तातडीने विचार व्हावा. पांडुरंग रायकर हे केवळ अव्यवस्थेचे बळी ठरले आहेत, परिषदेची मागणी आहे की, त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई दिली जावी. आणि कोरोना काळात कोरोना यौध्दे असलेल्या पत्रकारांना आपले काम अधिक निर्धाराने करता येईल, अशी व्यवस्था व्हावी, अशी आग्रही विनंती परिषदेच्या वतीने करण्यात आल्याचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले.