कंटेनमेंट झोनमध्ये दुकाने चालू ठेवणाऱ्या पाच जणांवर नारायणगाव पोलिसांची कारवाई

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव वारूळवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाला असताना येथे दुकाने चालू ठेवून सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्या तसेच गर्दी करून मास्क न लावणाऱ्या दुकानदारांवर नारायणगाव पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दिवसभर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना नारायणगावातील विविध भागातील दुकानांमध्ये मास्क न लावता तसेच पाच व पाचपेक्षा अधिक ग्राहकांची उपस्थिती असणे, आरोग्याची कोणतीही काळजी न घेणे, सॅनिटायझर न ठेवता व हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था न केल्याचे आढळल्याने आज पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

त्यानुसार पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल स्वामी समर्थ चे अनील गबाजी यादव, हॉटेल महालक्ष्मीचे गणेश अशोक पाटे, नारायणगाव येथील सिद्धेश्वर ट्रेडर्स चे अजित दशरथ मोरे, मुकेश ताजाराम देवासी व व मोहन दळवी यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले, सहाय्यक पोलीस फौजदार केंगले, पोलीस नाईक जढर, पोलीस नाईक जांभळे हे करीत आहेत.

नारायणगाव व वारूळवाडी मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झाला असताना नारायणगाव पासून पाच किलोमीटर चा परिसर बफर झोन म्हणून प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी घोषित केला आहे.

ज्या दुकानांना प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तसेच ग्राहकांनी व मालकांनी मास्क लावणे, सॅनिटायझर ठेवणे, हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या सूचनांचे पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर covid-19 प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली आहे.

जाहिरात