शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही, भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट

उरुळी कांचन

फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन केले.

गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी येथील एच. ए. मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास नव्या पिढीपर्यंत आणि समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण राज्यभर या महानाट्याचे प्रयोग करीत आहोत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. परंतु आज पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी पासेससाठी केलेला प्रकार खेदजनक आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

आजच्या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. कोल्हे यांनी व्यासपीठावर येऊन झालेल्या प्रकाराची नापसंती व्यक्त करताना प्रयोगासाठी तिकीट काढून आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर याच जनतेच्या करांच्या पैशातून आपला पगार होतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला फ्री पास मागता अन् तो दिला नाही तर नाटक कसं होतं ते पाहतो अशी धमकी देता? पोलिसांच्या २६/११ च्या वेळी, कोविड काळात जीवाची बाजी लावली त्या पोलीसांच्या उज्ज्वल परपंरेला मिळवलेल्या लौकिकास अशा क्षुल्लक गोष्टींसाठी गालबोट लावू नका अशी कळकळीची विनंतीही केली.

पोलिसांनी केलेल्या सहकार्याचा दाखला देताना डॉ. कोल्हे यांनी नाशिकमधील पोलीस आयुक्तांनी २५०० पोलीसांना तिकीट काढून ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य दाखवले याचा आवर्जून उल्लेख केला. त्याचबरोबर फ्री पासेससाठी गोंधळ घालणाऱ्या पोलीसांचे नाव घेणार नाही, कारण विरोध व्यक्तीला नसून फ्री पासेसची मागणी करण्याच्या प्रवृत्तीला विरोध असल्याचे त्यांनी सांगून डॉ. कोल्हे यांनी फ्री पासेस दिले नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सादर करु दिला जाणार नाही अशी धमकी देणाऱ्या पोलीसांना कडक समज द्यावी अशी मागणी केली.

Previous articleमाजी विद्यार्थ्यांची २० वर्षांनी पुन्हा भरली शाळा
Next articleसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत ; बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवणार – खा. डॉ. अमोल कोल्हे