शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांंना दुखापत

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

कराडमधील कल्याणी मैदानावर २८ एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. कालच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु १ मे हा महाराष्ट् राज्याचा स्थापना दिवस. या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळं आहे. त्यामुळे दुखापत झाली असली तरी १ मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. मात्र उर्वरीत दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे दुखापतीमुळे रद्द करावे लागणार असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने पाठीतून तीव्र कळा जाणवत आहेत. त्यामुळे १ मे रोजीचा प्रयोग संपल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार असून पुन्हा नव्या जोमाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे पुरेशी विश्रांती व उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर ११ ते १६ मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील असे त्यांनी सांगितले.

Previous articleपुणे सोलापूर महामार्गावर चौफुल्याजवळ रेफ्रिजरेटर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला भीषण आग
Next articleमहावितरण मधील कंत्राटी कामगारांचे लाक्षणिक उपोषण