चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त

नारायणगाव :- (किरण वाजगे)

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई, मासई नगर तांबरम, चैन्नई) रविंद्रम गोपीनाथम (रा. नाॅर्थ पोलीस क्वाॅर्टर, वेल्लूर, यादवराज शक्तीवेल रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम चैन्नई),आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चैन्नई) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट व डिझायर कार चोरी जावून एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार पो निरिक्षक शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देवून शिरूर विभागाच्या तपास पथकाला दाखल गुन्हयांचा सखोल तपास करण्यास सांगितले असता सर्व चोरी गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये निष्पन्न झाले. चोरीच्या गाडया कोणत्या राज्यात आहेत, याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळविली असता चोरी गेलेली वाहने तामिळनाडु राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती मिळाल्याने शिरूर विभागाचे तपास पथक चैन्नई येथे पाठवून राजा कल्याण सुंदराम, रविंद्रम गोपीनाथम, यादवराज शक्तीवेल यांना ताब्यात घेवून एक डिझायर कार हस्तगत केली. त्यांचेकडे मिळून आलेली कार त्यांना आर सुधाकरण याने दिली होती.

सुधाकरण याला पुणे ग्रामीण पोलीस चैन्नई मध्ये असलेबाबत चाहूल लागल्याने तो चैन्नई सोडून गेला गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण आधारे सुधाकरण यास शाहगढ जालना परीसरातून ताब्यात घेवून त्याचे कडे तपास केला असता, त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाडया खरेदी केल्या असल्याचे सांगितले, त्यास विश्वासात घेवून त्याचेमार्फतीने तीन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आले चैन्नई परीसरात विक्री केलेल्या तीस लाख रूपयेे किंमतीच्या चार कार त्यामध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार हस्तगत करण्यात आली.

आरोपी आर सुधाकरण याने खरेदी केलेली वाहने ही त्यास कोणी दिली आहेत, अगर आरोपी आर सुधाकरण गाडया चोरी करताना हेाता का? याबाबत पोलीस तपास करत असून चोरी करणारे आरोपी हे तामिळनाडू व महाराष्ट्रातील आंतरराज्य आरोपी एकत्रित येवून लॅपटाॅप मधील साॅफ्टवेअर वापरून कार अनलाॅक करून स्विफ्ट व डिझायर कार चोरी करत असलेबाबत सांगितले आरोपींना शिरूर पोलीस ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, सचिन घाडगे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे,अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलीस नाईक संदिप वारे, अमोल शेडगे, पोना मंगेश भगत, पोलीस शिपाई अक्षय नवले, दगडु विरकर, अक्षय सुपे, यांनी केली आहे.

Previous articleघोडेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
Next articleविठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या व्यासपीठावर थेट बैलगाडा : समई नृत्य सादर करून संध्या माने यांनी मिळवली रसिकांची वाहवा