घरासमोर वरातीचे आयोजन केल्याने वरबापावर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट, निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचे संसर्ग वाढू नये, म्हणून जिल्हाधिकारी व प्रांत यांनी दिलेल्या आदेशानुसार रुग्ण सापडलेले गाव, केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्रात विनापरवाना फिरणे, गर्दी जमवणे, दुकाने उघडी ठेवणे यासाठी बंदी असतानाही नांदूर येथील नामदेव लक्ष्मण जाधव यांनी आपल्या मुलाच्या लग्ना निमित्ताने घरासमोर वरातीचे आयोजन करून लोकांची गर्दी होईल असे वर्तन केल्याने त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून कोरोना रुग्णाची संख्या ८०० च्या जवळ गेली आहे.कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

तालुक्यातील नांदूर गावात कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याने परिसरात कुणीही बाहेर फिरू नये , गर्दी जमवू नये असे आदेश दिले आहेत .त्या संदर्भात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई के.एस.पाबळे, पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना नांदूर गावचे हद्दीत नामदेव लक्ष्‍मण जाधव ( राहणार नांदूर ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त घरासमोर वरातीचे आयोजन करून लोकांची गर्दी केली होती त्यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्स नियम न पाळता कुठलीही काळजी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेश पालन न करणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस शिपाई के.एस.पाबळे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleउरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३८ रुग्ण
Next articleमंचर येथे दिवसा घरफोडी ; ४५ हजारांचे दागिने लंपास