दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक

नारायणगाव (किरण वाजगे):– दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन इसमांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना झापवाडी (ता. जुन्नर) येथे घडली.

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.२३) पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास झापवाडी गावच्या हद्दीतील एका वस्तीवरील घरावर ५ दरोडेखोर दरोडा घालण्याचा’ प्रयत्न करत होते. यावेळी घरातली रहिवाशांना जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला. आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी घरावर दगडफेक करून व दहशद निर्माण करुन मंगरुळ गावच्या वनविभागाच्या हद्दीत दोघे पळून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. सदर घटनेची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. पोलिसांनी तात्काळ गावातील चार ही रस्त्यावर नाका-बंदी करून त्यापैकी एक मोटर सायकल चा पाठलाग करून दोन दरोडेखोर पकडले. त्यापैकी एक इसम वन विभागाच्या जंगलात पळून गेला. पोलिसांनी पकडलेल्या दोघांकडे कोयता, कटावणी मोसा व इतर दरोड्याचे साहित्य असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या सोबत चे पळून गेलेल्या इतर ३ इसमांची नावे निष्पन्न झाली आहेत. या बाबत आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी ३९९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.

ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस हवालदार भोईर ,पोलीस नाईक संदीप फड ,पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, पोलीस कॉन्स्टेबल मोमीन, चालक समाधान अहिवळे , होमगार्ड शिरतर यांच्या पथकाने केली.

या गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल पथवे (वय ४५, रा. अकोले तालुका, जि. नगर व सोन्या पथवे (वय २८, रा. अकोले तालुका, जि. नगर) यांना अटक करण्यात आली असून सागर पथवे, पिंट्या व सावंत असे तिघेजण अन्य आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकल, गुप्ती. बॅटरी, कोयता आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र ओझर इथे झालेल्या दानपेटी चोरीच्या गुन्ह्यामध्ये या आरोपींना वर्ग केले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतवर प्रशासकाची नेमणूक
Next articleजुन्नर तालुक्यात आजपर्यंत ८०१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी