घरादारावर जणू तुळशी पत्र ठेवून काम करणाऱ्या प्रयोगशाळा वैज्ञानिकांचे कार्य कौतुकास्पद

नारायणगाव (किरण वाजगे)

संपूर्ण जगाला आर्थिक द्रुष्ट्या बेजार करणाऱ्या कोरोना महामारी विरोधात आज संपूर्ण जग युद्ध लढत आहे. अशाच प्रकारे आपल्या घरादारावर जणू तुळशी पत्र ठेवून काम करणाऱ्या प्रयोगशाळा वैज्ञानिकांचे कार्य कौतुकास्पद आहे.

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ६५० च्या पुढे गेला आहे, बळींची संख्या २८ वर पोहोचलेली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या रोगाच्या वेढ्यातून सहिसलामत बाहेर पडून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही  समाधानकारक आहे. ही लढाई लढताना जनतेबरोबरच कंबर कसुन कोरोना रुग्णांना बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते या रोगाची चाचणी करणारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व कर्मचारी…! कोरोना संसर्गाचा धोका पत्करून आज हे कोरोना वीर आपल्या प्राणांची बाजी लावून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावत आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्याने पदोपदी या कर्मचाऱ्यांना रोगाची लागण होण्याचा धोका कायम असतो. मात्र राष्ट्रकार्य म्हणून हे सर्व कर्मचारी लढत आहेत.

दि.२१ मे २०२० पासून लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच काही दिवसांपूर्वी ओझर येथे देखील कोवीड सेंटर उभारण्यात आले. तेव्हापासून येथे आतापर्यंत सुमारे चार हजार पेक्षा जास्त रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. स्वॅब स्टीक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या हाती दिली गेली आहे.

या कोरोना च्या लढाईत पुणे जिल्हा मध्यवर्ती प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सयाजी शिवाजी काळे आणि त्यांची तालुक्यातीलच न्हवे तर जिल्ह्यातील संपूर्ण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या टीमने या लढाईत स्वतःला प्रामाणिकपणे झोकून दिले आहे. यामध्ये व्हीटीएम लेबलिंग, स्वॅब कलेक्शन, पॅकिंग, आर.टी.पी.सी.आर. सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाइन एंन्ट्री अशी सर्व कामे दोघा जणांची टीम बनवून रोटेशन पद्धतीने कुटुंबाची जिवाची पर्वा न करता ते अखंडपणे करत आहेत.

लेण्याद्री कोविड केअर सेंटर चालू झाल्यापासून मोठ्या हिमतीने अनेक अडचणींवर मात करत ‘ कोरोना हरेल- देश जिंकेल’ हा आत्मविश्वास  उराशी बाळगून ‘हम सब एक है’ याची प्रचिती देत पुणे जिल्हा मध्यवर्ती प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सयाजी काळे आणि त्यांच्या तालुक्यातील टीमचे सदस्य अल्लाबक्ष शेख, शीतल दरंदाळे, चेतना भावसार, भारती माळी, सुनंदा साबळे, योगिता बोरसे, गीतांजली जोगदंड, बाळू तळपे, जगदीश इंगळूणकर, ज्योती काळे, अर्चना पाटोळे, स्वाती रत्नपारखी, दत्ता रोकडे हे सेवा देत आहेत. देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या कार्याला समाजातील सर्व घटकांचा मानाचा मुजरा.

Previous articleबिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचा नमो ग्रुप फाउंडेशनच्या वतीने ‘कोरोना योद्धा’पुरस्कार देऊन गौरव
Next articleदौंड मधील कोरोना परिस्थिती चिंताजनक शहर सह ग्रामीण भागात दोन दिवसात 70 रुग्ण