कोरोना महामारीच्या संकटामुळे गणेशोत्सवातील लाखोंची उलाढाल मंदावली

अमोल भोसले — उरुळी कांचन, प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या संकटामुळे वैभवशाली गणेशोत्सवातील मंडप, देखावे, विद्यूत रोषणाई व सजावटीवर निर्बंध आल्याने उत्सवातील लाखोंची उलाढाल थांबली आहे. यामुळे असंख्य होतकरु कलाकार, कारागीर, कुशल कामगारांच्या रोजगाराची साखळी तुटणार आहे. यासर्वाचे गणेशोत्सवातील दहा दिवसांवर वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र कोरोनामुळे यंदा या सर्वावर पाणी पडणार आहे.
दरवर्षी हलत्या देखाव्यासाठी सुमारे ४ महिने अगोदर कामाला सुरुवात होते. ऐतिहासिक, समाजप्रबोधनात्मक विषय या देखाव्यातून हाताळले जातात. कोरोनाच्या संकटाने यंदा देखाव्यांवरही निर्बंध येऊन लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गणेशोत्सव साजरा करताना निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये शासनाने छोटी मूर्ती व छोटे मंडप घालण्याचा आदेश दिला आहे.अन्यथा कारवाईचा इशाराही दिला गेल्याने मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. परवानगी नसल्याने व साधेपणानं गणेशोत्सव साजरा करावा असा आदेश असल्याने सजावटकार आणि रोषणाई करणारेच अडचणीत आहेत. व्यवसायिकांचे लहान-मोठे मंडप, सजावट व रोषणाई कमी स्वरूपात असल्याने व्यवसायिक आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये जो व्यवसाय होतो, त्यावरच पुढील काही महिन्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. कोरोनामुळे गेले तीन महिने घरी गेल्याने आता वर्षभर काय करायचे हा ? हा प्रश्न त्यांना पडला आहे. उन्हाळ्याच्या हंगामासाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य या व्यावसायिकांना यापुर्वीच खरेदी केले आहेत. आता हे सर्व साहित्य धूळ खात पडले आहे. अनेकांनी कर्ज काढून साहित्य घेतले आहे. कोणाचे घर भाड्याचे आहे. कोणाचे गोडाउन भाड्याचे आहे. मुलांच्या शाळांचे शुल्क भरायचे आहे. यावर्षी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिकांना कामच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

श्रींच्या मिरवणुकीसाठी पुणे शहर व उपनगरात बहुतांशी ठिकाणी ग्रामीण भागातूनच ट्रॅक्टर येतात. यांतून ट्रॅक्टर मालकांना ३ ते ४ दिवसांच्या कालावधीत २५ ते ३० हजार रूपये मिळायचे. परंतू  प्रशासनाने मिरवणूकीवरही निर्बंध घातल्याने ट्रॅक्टर मालकही अडचणीत सापडले आहेत. एकूणच गणेशाचे स्वागत आणि विसर्जन यात गुंतलेल्या हजारो हातांचे दहा दिवसांवर वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र कोरोना रोगाच्या महामारीमुळे या हजारों हातांचा आर्थिक मंडप कोसळला असून लाखोंच्या उलाढालीवर पाणी पडले आहे.

शिवाजी रायकर, महेंद्र लांडगे ( मंडप व्यावसायिक, लोणी काळभोर ) – गणेशोत्सवापासुन दिवाळीपर्यत आमच्या व्यवसायाला सुगीचे दिवस असतात. गणेशोत्सवातील सार्वजनिक मंडळेही छोट्या मंडपापासून मोठ्या मंडळांच्या मंडपाची रचना, मंडपाचा आकार व त्यात आकर्षक विद्युत रोषणाई याची मागणी करत असतात. श्रावण महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागातील मंडप व्यावसायिकांना काम मिळते. गणेशोत्सवाला आगळे स्थान असल्याने या उत्सवावर विद्युत रोषणाई, मंडपात वापरल्या जाणाऱ्या कलाकुसरीच्या मंडपाची उभारणी, कापड शिलाई, सजावट, हालते देखावे, जिवंत देखावे साहित्यानुसार भाडे ठरत असते. बांबू लाकूड कामातील पारंगत कामगारांना गणपतीचे दिवस सुगीचे वाटतात मात्र करोनामुळे कुशल कारागीर व मंडप व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहे.

राहूल गरसोळे व प्रदीप लोहार ( हलते देखावे भाडेतत्वावर देणारे मुर्तीकार, ऊरूळी कांचन ) – गणेशोत्सवात हलत्या देखाव्यांचे काम सुमारे ४ महिने सुरू असायचे. यासाठी १५ ते २० कामगार काम करत असत. भाडेतत्वावर देखावे देवून सुमारे २० ते २५ लाख रूपये गणेशोत्सव कालावधीत जमा होत असत. सर्व खर्च व  कामगारांचे वेतन वगळता सुमारे १० लाख रूपये निव्वळ नफा मिळत असे. परंतू कोरोना मुळे यावर्षी मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.

Previous articleदिलासादायक-जुन्नर तालुक्यात ६२१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४७४ रुग्ण बरे होऊन घरी
Next articleमाझ्या शिक्षक बांधवांना स्वजिल्ह्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-निर्मला पानसरे