आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ९ पैकी ९ जागा जिंकणार – आ. अतुल बेनके

नारायणगाव : (किरण वाजगे)

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी नऊ जागा जिंकून जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद सत्ता स्थापन करेल असा विश्वास आमदार अतुल बेनके यांनी आज नारायणगाव येथे व्यक्त केला.
सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय अस्थिरतेविषयी, तालुक्यातील विविध विकासकामांविषयी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आमदार अतुल बेनके यांनी आज नारायणगाव येथे आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात चालू असलेल्या सत्तासंघर्षा निमित्त पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना यांनी समर्पक उत्तरे दिली. याशिवाय कुकडी धरण प्रकल्पाचे पाणी नियोजनाबाबत बोलताना तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी मिळणार आहे. २२ कोटी रुपये डिंबा डाव्यांच्या कालव्यासाठी मंजूर झाले आहेत. यापुढे कुकडी प्रकल्प धरणांच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. याशिवाय विविध कामाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामाबाबत तसेच रोजगार संदर्भात पर्यटनवाढीसाठी करण्यात येणारी कामे त्यांनी विषद केली. तसेच सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला किंवा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांना काही ऑफर आल्या होत्या का याविषयी देखील त्यांनी आपल्याला किंवा काँग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या आमदारांना अशा कोणत्याही ऑफर आलेल्या नाहीत असे सांगितले. तसेच यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

आ. अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेपूर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकी बाबतची रणनीती ठरवली असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार झाल्या पासून आपण तालुक्यातील रोजगार निर्मितीसाठी काय केले याविषयी बोलताना त्यांनी पर्यटनाबाबत च्या विविध योजना व त्यातून निर्माण होणारे रोजगार याविषयीची माहिती दिली. तालुक्यात अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्या विषयी विचारल्यावर लवकरच रस्त्यांची कामे सुरू होतील असे आ. बेनकेंनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, भाऊ देवाडे, अशोक घोडके, सरपंच गोट्याभाऊ वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकै.सुदाम कोतवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास चहा व अन्नदान आणि मोफत पाणी वाटप
Next articleछत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप