पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नारायणगाव ,किरण वाजगे

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आदी तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आपण पोलीस असल्याचे सांगून हातचालखीने वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या दोन भामट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बेहराम उर्फ मुस्तफा इज्जत अली सय्यद आणि खैबर अजीज जाफरी (दोघेही राहणार आंबिवली रेल्वे स्टेशन इराणी वस्ती) या दोघांनाही पोलिसांनी जुन्नर येथून ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, गणेश जगदाळे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, गुरु जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, समाधान नाईकनवरे पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, तुकाराम होगे यांनी केली असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान या दोन सराईत चोरट्यांनी नारायणगाव, आळेफाटा, रांजणगाव, खेड, जुन्नर, मंचर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून आरोपींना नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या आरोपींकडून २ लाख ३८ हजार ३१० रूपयांचे सोने, मोबाईल व गाड्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Previous articleमुलाने केला जन्मदात्या बापाचा खून
Next articleकाळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप पवार यांची निवड