हवेली तालुका कृषी विभागाच्यावतीने महिलांसाठी मूल्य वर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण

उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी, हवेली व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मूल्य वर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने या भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता आहे.

उरुळी कांचनचे प्रसिद्ध युवा उद्योजक ‘ मीलेट मॅन ‘ महेश लोंढे यांनी नाचणी, राळा, इत्यादी भरड धान्य पासून बिस्कीट, लाडू, चिवडा, पोहे, प्रोटीन पावडर, शेवया, नुडल्स इत्यादी पदार्थ बनविण्याच्या पद्धती सांगितल्या. आहारातील भरड धान्याचे महत्व सांगताना त्यांनी भविष्यातील संधी व या व्यवसायातील अर्थकारण सोप्या भाषेत सांगितले. या नंतर जिल्हा संशाधन व्यक्ती तेजोमय घाडगे यांनी विविध प्रक्रिया उद्योग, त्यांचे प्रशिक्षण, अनुदान याबद्दल माहिती दिली. तसेच हरितगृह व शेडनेटचे शासकीय निकष व अनुदानाची कार्यपद्धती सांगितली. कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांनी कृषी निर्यात धोरण, संधी व सेंद्रिय शेती बद्दल विस्तृत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर यांनी ठिबक सिंचन योजना विस्तृत पणे सांगीतली. मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग यांनी शासनाच्या विविध योजना सांगताना जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. सरपंच संध्याताई अमित चौधरी यांनी अधिकाधिक महिला उद्योजकांनी पुढे येऊन आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन केले.

तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा शिंदे, बी. टी. एम. आत्मा यांनी नियोजन केले. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला अमित चौधरी, राजेंद्र चोरगे, भाऊसाहेब चौधरी, अशोकराज चौधरी, नंदकुमार चौधरी, सचिन चौधरी, कावेरी किशोर चोरघे, सुजाता राजेंद्र चौधरी, रुपाली सचिन चौधरी, सुनिता दिलीप चौधरी उपस्थित होते.

Previous articleदुर्देवी – चासकमान धरणात चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
Next articleचालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 22 प्रवाशांचे प्राण; शिंदवणे घाटातील घटना