नारायणगावात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खून

नारायणगाव ,किरण वाजगे

गेली तीन ते चार दिवसांपासून नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे उलट सुलट चर्चेला मोठे उधाण आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नारायणगावात एका युवतीचा झालेला अपघाती मृत्यू त्यानंतर सापडलेले दोन मृतदेह तसेच हॉटेल कपिल बियर बार येथे दोन गटात झालेली गोळीबाराची घटना, वारूळवाडी हद्दीत डिंभा डाव्या कालव्यालगत असलेल्या तलावात सापडलेला युवतीचा मृतदेह, यानंतर लागोपाठ दोन दिवस झालेले खून यामुळे सध्या नारायणगाव पोलिस स्टेशन पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
काल दोन बिहारी कामगारांच्या भांडणातील एकाच्या खुनानंतर आज नारायणगाव येथील बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेच्या व मते हॉस्पिटलच्या मागे असलेल्या श्री हरिहरेश्वर मंदिराजवळ संभाजी उर्फ गोविंद बबन गायकवाड (रा. येणेरे ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा मृतदेह आढळून आला आहे. लाकडी दांडक्याने किंवा लोखंडी गजाने मृत इसमाच्या डोक्यात जबर मार लागला असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्वारे काही तपास लागतोय का याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उप निरीक्षक जगदाळे, हवालदार दिपक साबळे, पोलीस शिपाई नवले, सुपेकर हे करत आहेत.
गोविंद गायकवाड यांच्या मृतदेहाजवळ चटई, काही वस्तू, पांघरून मिळून आले आहे. या इसमाचा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. गायकवाड हे जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत होते अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी कांदळी येथील अनंत पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा झालेला खून, तसेच वाढत्या बंद फ्लॅट मधील चोऱ्या, कृषी पंपाची व केबलची चोरी, तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नारायणगाव येथे मृतदेह सापडणे, अपघात, गोळीबार व खून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्यामुळे देखील नागरिकांमध्ये चर्चेला मोठे उधाण आले आहे.

Previous articleएव्हिएन्स सायंटिफिक संस्थेमार्फत बीजेएस कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे रिचार्जेबल एल इ डी बल्ब ची कार्यशाळा
Next articleकृषी विभागाच्या वतीने शेतकरी चर्चासत्र वडकी येथे संपन्न