थेऊर फाटा ते थेऊर रस्त्याच्या कामाला सुरुवात : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

थेऊर (पुणे) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेऊर फाटा ते थेऊर रस्त्याच्या कामाबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.

अष्टविनायक गणपती देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथे जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या या अष्टविनायक मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हॅम प्रकल्पांतर्गत सुरू आहे. मात्र या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम ठप्प झाले होते.

या रस्त्याची अतिशय दूरवस्था झाली असल्याने सातत्याने अपघात होत असल्याने फेसबुकसह समाजमाध्यमांवर वारंवार पोस्ट व्हायरल होत होत्या. या जनभावनेची दखल घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या. उच्च न्यायालयात सुनावणी लवकर व्हावी आणि स्थगिती उठवावी यासाठी सूचना दिल्या. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या सुनावणीसाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुभकोणी यांना लक्ष घालण्याची सूचना केली.

या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने थेऊर फाटा ते थेऊर रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती उठवली. ही स्थगिती उठताच तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी दिले होते. त्यामुळे स्थगिती उठताच त्वरीत काम सुरू करण्याची जय्यत तयारी केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली असून साडेपाच मीटरने या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या थेऊर फाटा ते थेऊर रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार असून परिसरातील गावांतील नागरिकांची विशेषतः अष्टविनायक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी आणखी एक रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे असे म्हणता येईल.

Previous articleबकोरी येथील दत्तकृपा विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत ‘दत्तकृपा सहकारी पॅनेल’चे वर्चस्व
Next articleशिंदवणे सोसायटीतील १५ वर्षाची सत्ता आण्णा महाडिक गटाने टाकली उलथून