नारायणागवात दोन गटांमधील भांडणात १४ जणांवर गुन्हा दाखल; पिस्तूल व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून गोळीबार

नारायणगाव , किरण वाजगे

पुणे-नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे शहर असलेल्या नारायणगाव येथील हॉटेल कपिल बियर बार मध्ये दोन गटांत झालेल्या किरकोळ वादातून पिस्तूल व चाकू सारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ही घटना मंगळवारी दिनांक १० रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

नारायणगाव येथे राहणाऱ्या मनीष उर्फ मन्या पाटे, गणपत गाडेकर यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथीदार व समोरच्या गटातील आकाश उर्फ बाबू कोळी (रा. घोडेगाव तालुका आंबेगाव) यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे दोन अज्ञात साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मनीष ऊर्फ मन्या पाटे व आकाश कोळी यांना अटक करण्यात आली असून बाकीचे आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल कपिल येथे दोन वेगवेगळ्या टेबलवर जेवण करण्यासाठी हे आरोपी बसले होते. रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली यावेळी मन्या पाटे, गणपत गाडेकर व त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी धारदार चाकूने आकाश कोळी व त्याच्या साथीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तत्क्षणी आकाश कोळी याच्या साथीदारांने पिस्तुलातून मन्या पाटे च्या दिशेने एक राऊंड फायर करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर भा.द.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २ जणांना अटक करण्यात आली असून ही घटना पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नारायणगाव बस स्थानकाजवळील जुन्नर रस्त्यावर भर चौकात घडली आहे. विशेष म्हणजे येथे जवळच हाकेच्या अंतरावर पोलीस मदत केंद्र आहे. आणि येथे नेहमी मोठी वर्दळ असते.
दरम्यान गोळीबाराच्या या प्रकारामुळे नेहमी शांत असलेल्या नारायणगावात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या सर्वत्र अल्पवयीन गुन्हेगारांचा सुळसुळाट

दरम्यान मागील वर्षात मंचर जवळ झालेल्या एका खून प्रकरणात नारायणगावात राहणाऱ्या एक अल्पवयीन आरोपीला पिस्तुलासह अटक करण्यात आली होती. तसेच १ वर्षापूर्वी नारायणगाव येथील संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने झालेल्या खुनी हल्ला प्रकरणात देखील अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांबाबत पोलिसांसह गुन्हेगारांचे पालक व सर्वच जण चिंता व्यक्त करीत आहेत.

दरम्यान हॉटेल कपिल बियर बार मध्ये झालेल्या गुन्ह्यातील काही आरोपी यापूर्वी जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर व शिरूर आदी तालुक्यासह इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत का याविषयीची चौकशी देखील पोलिसांकडून केली जात आहे. या बियर बार मधील व जवळपासच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिले.

Previous articleऐतिहासिक बारवेवरचे अतिक्रमण हटविण्याची मागणी
Next articleप्रा. कैलास महानोर राज्यस्तरीय आदर्श ग्रँड मास्टर पुरस्काराने सन्मानित