नारायणगाव येथे गॅस दाहिनी मध्ये मोठा स्फोट

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गॅस दाहिनी मध्ये आज रात्री मोठा स्फोट झाल्याने स्मशानभूमी परिसरातील रहिवाशां मध्ये मोठी घबराट निर्माण झाली. ही घटना १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत गॅस दाहीनीपासून अवघ्या वीस फुटावर राहात असलेले सामाजिक कार्यकर्ते सदाशिव नेवकर, स्वप्निल नेवकर यांनी मोठी भीती व्यक्त केली.
दरम्यान या गॅस दाहिनी मध्ये एका महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आला होता मृतदेह गॅस दाहिनी मध्ये ठेवल्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला यावेळी तेथे कार्यरत असलेले सचिन उर्फ गोट्या जाधव यांनी तात्काळ गॅस टाक्यांचे रेग्युलेटर बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. स्फोट झाल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाला. त्यानंतर सुमारे दीड ते दोन तासानंतर नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी व महिलेच्या नातेवाईकांनी गॅस दाहिनी मध्ये लाकडे टाकून अंत्यविधी पूर्ण केला.

दरम्यान या गॅस दाहिनी च्या कामामध्ये योग्य टेक्निशियन म्हणजेच ज्याला गॅस दाहिनी बद्दल माहित आहे अशा जाणकार व्यक्तीने गॅस दाहिनी मध्ये उपस्थित राहून अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. सुदैवाने आज झालेल्या स्फोटामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.