नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

नारायणगाव : किरण वाजगे

पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव चे ग्रामदेवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त मागील तीन दिवसात सुमारे दीड लाख भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्री मुक्ताबाई देवीच्या दर्शनासाठी अनेक आबालवृद्ध महिलांनी दर्शन घेतले. तसेच गुरुवारी (दि.२८ ) रोजी रात्री आयोजित करण्यात आलेल्या शोभेच्या दारूकामाचा हजारो भाविकांनी आनंद लुटला. यावेळी रघुवीर खेडकर यांच्या तमाशा च्या व्यासपीठावरून शोभेच्या दारूकामाचे थेट समालोचन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले.

यादरम्यान येत्या २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या “तिरसाट” या चित्रपटाचे प्रमोशन देखील करण्यात आले. याप्रसंगी फडमालक रघुवीर खेडकर, लेखक व निर्माता दिनेश किरवे, दिग्दर्शक प्रदिप टोणगे, मंगेश शेंडगे, अभिनेता निरज सुर्यकांत, अभिनेत्री तेजस्वीनी शिर्के, यात्रा कमिटीचे सदस्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन किरण वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून नारायणगावातील मुस्लिम बांधव शोभेचे दारूकाम मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त मोफत करीत असतात. यामुळेच नारायणगावात हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन नेहमी पाहायला मिळते.

दरम्यान यात्रेमध्ये असलेल्या आकर्षक गगनचुंबी आकाश पाळण्यात, तसेच झुक झुक गाडी, वेगवेगळे आकर्षक झुलते पाळणे, खाद्यपदार्थ, विविध वस्तू, आकर्षक महिलांच्या गृहोपयोगी, शोभिवंत, मेकअपच्या वस्तूंच्या तसेच खेळण्यांच्या सजलेल्या दुकानांमध्ये अनेकांनी मोठी गर्दी केली होती.गुरुवारी रात्री अकरा वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाला देखील हजारो तमाशा रसिक उपस्थित होते.

पहाटे तीन वाजेपर्यंत चाललेल्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाला नारायणगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleडॉ. सुनील पवार यांचा महाराष्ट्र शासनाच्या आदर्श कार्यक्षम अधिकारी पुरस्काराने गौरव
Next articleउरुळी कांचनमध्ये श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न