दुर्देवी- कालव्यात बुडणाऱ्या एकाचा मृत्यू , तिघांचे वाचवले प्राण

किरण वाजगे

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आर्वी केंद्राजवळ वडज धरणाचा मीना शाखा कालवा व डिंभा धरणाचा डावा कालवा एकत्रित येणार्‍या संगमाजवळ शनिवार (दि.२३ ) एप्रिल रोजी दुपारी कालव्यात पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी तीन जणांना वाचवण्यात येथील चार युवकांना यश मिळाले. मात्र दुर्दैवाने १६ वर्षीय नौषाद गुलाम खान या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

दरम्यान माजी सैनिक चंद्रकांत मुळे यांच्या पत्नी वैशाली यांनी कालव्याजवळ असताना वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी जवळच असलेल्या युवकांना तात्काळ बोलावले. यावेळी तेथे असलेले युवक भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के, निरंजन वैष्णव व सिद्धार्थ जाधव यांनी पाण्यात बुडत असलेले कुमार रेहान, कुमार शर्मा व नाव न समजलेला अन्य एक जण अशा तिघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून कालव्याच्या बाहेर सुखरूप काढून जीवदान दिले.

या कामगिरीबद्दल नारायणगाव येथील श्री मुक्ताई देवी यात्रा कमिटीच्या वतीने या चारही युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या नौषाद खान चे वडील गुलाम मुस्तफा सलीम खान (रा. ओमकार समृद्धी सोसायटी, कोल्हेमळा, नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिस स्थानकात आपल्या मुलाच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्याचा मृत्यू हा पाण्यात बुडून व दुर्दैवाने झाला असून त्याचे पोस्टमार्टम करू नये अशा आशयाचा जबाब नारायणगाव पोलीस स्थानकात दिला आहे.

दरम्यान गुलाम मुस्तफा खान यांचा कोल्हे मळा येथे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.माझा मुलगा माझी दुचाकी घेऊन आर्वी केंद्र येथे कालव्यावर पोहायला गेला व पाण्यात बुडाला अशी माहिती मिळताच मी काही जणांसह तेथे गेलो व माझ्या मुलाला नारायणगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे जबाबात गुलाम खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान तीन युवकांना जीवदान देणाऱ्या निरंजन वैष्णव, भूषण सोनवणे, सिद्धांत म्हस्के व सिद्धार्थ जाधव यांच्यावर तिघांचे प्राण वाचवल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleनिधन वार्ता- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते दत्तात्रेय जाधव यांचे निधन
Next articleकवठे येमाई येथे जागतिक हिवताप दिन साजरा