वंचितांच्या शिक्षणासाठी टच अ लाइफचे कार्य मोलाचे – शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे

नारायणगाव : किरण वाजगे

नव्या संगणक युगात प्रवेश करताना अजूनही दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नाहीत या पार्श्वभूमीवर टच अ लाइफ आणि पारीख फाउंडेशन यांनी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय अशी सर्व सुविधा युक्त सुसज्ज इमारत निर्माण केले आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे विचार पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे यांनी व्यक्त केले.

“मंदिराच्या कलशारोहण इतकाच महत्त्वाचा हा उपक्रम आहे, आपल्याकडे लोकशिक्षणाची चळवळ अजून प्रभावी पणे राबवण्यासाठी अशा दानशूर दात्यांच्या योगदानाची गरज आहे” असे मत तहसीलदार रविन्द्र सबनीस यांनी व्यक्त केले.पारीख फाऊंडेशन अशा सर्व उपक्रमांत सातत्याने योगदान देत राहील असा विश्वास मिलन पारीख यांनी व्यक्त केला.

येडेश्वर विद्यालय येडगाव येथे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या उद्घाटन २३ एप्रिल रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.या उपक्रमासाठी मोलाचे योगदान देणारे पारीख फाऊंडेशनचे जितूभाई पारीख आणि मिलन पारीख हे देखील उपस्थित होते.

टच अ लाइफ या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३५ शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीची मोफत पाठ्यपुस्तके गेली चार वर्षे दिली जात आहेत आणि अकरा शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग प्रोजेक्टर देण्यात आलेला आहे अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक नरेश सुराणा यांनी दिली .

या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ गुलाब नेहरकर, राजेंद्र रासकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सिताराम सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे आणि सचिव अशोक काकडे, मारुती ढोबळे, दीपक घाडगे,सुरेश कसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गणपुले यांनी केले तर आभारप्रदर्शन दीपक घाडगे यांनी केले.

Previous articleरामोजी फिल्म सिटीमध्ये हॉलिडे कार्निवल मध्ये ग्रुप डान्समध्ये शिरुर परीसरातील ग्रामिण महिलांना पारितोषिक
Next articleनिधन वार्ता- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते दत्तात्रेय जाधव यांचे निधन