वाघोलीत बेवारस तरुणाला मिळाला ‘माहेर’ संस्थेच्या ‘करुणालया’चा ‘आधार’

अमोल भोसले

वाघोली परिसरात १० ते १२ दिवसांपासून एक युवक अत्यंत दयनीय अवस्थेत वावरत होता.मिळेल ते खायचे व रात्री कुठेही झोपायचे हि त्याची सध्याची दिनचर्या होती.पंरतु वाढत्या तापमानामुळे व पुरेशे अन्न व पाणी न मिळाल्याने त्या युवकाची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती.जागेवरून उभे राहणे ही त्यास अशक्यप्राय झाले होते.त्यामुळे तो एका ठिकाणी मरणासन्न अवस्थेत पडून होता.

हि गोष्ट मिलिंद गुडदे यांनी वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार गणेश सातव यांच्या कानावर घातली असता गणेश सातव यांनी त्वरित त्या युवकास प्रथमतः उचलून एका सावलीच्या ठिकाणी बसवून त्यास पाणी व अल्पोहार देत त्याची विचारपूस केली.यावेळी हा युवक नोकरीसाठी महाराष्ट्रात आल्याचे स्पष्ट झाले.हा युवक निराधार असल्याचे त्याने सांगितले.

हा तरुण निराधार असल्याने त्याला उपचार व पुढील पुनर्वसनासाठी माहेर संस्थेच्या सणसवाडी(ता-शिरुर) येथील ‘करुणालया’ प्रकल्पात दाखल करण्याचे ठरले.तत्पूर्वी युवकास प्राथमिक उपचार करणे आवश्यक असल्याने गणेश सातव यांनी पत्रकार मित्र सचिन धुमाळ,शंकर पाबळे यांच्या मदतीने वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नागसेन लोखंडे यांना घेऊन सदर तरुणांची तपासणी केली.त्यानंतर वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शनी शिंगारे यांच्याकडे या तरुणाला पुढील उपचार व पुनर्वसनसाठी माहेर संस्थेच्या करुणालया प्रकल्पात दाखल करणेकामी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची विनंती केली असता त्यांनी हि त्वरित सदर ठिकाणी रुग्णवाहिका पाठवून दिली.

लोणीकंद पोलिस ठाणे येथे काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व उपचार व पुनर्वसन यासाठी संस्थेत दाखल करुन घेण्याबाबचे पत्र तयार करून घेऊन या तरुणास माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील ‘करुणालया’ प्रकल्पात दाखल केले असून त्या ठिकाणी त्यावर उपचार केले जाणार आहेत.याकामी लोणीकंद पोलीस ठाणे व माहेर संस्थेचे सचिन पिसे,तुकाराम डोकले,विठ्ठल गायकवाड यांनी मोठे सहकार्य केले.

गणेश सातव यांनी माणुसकी जपत आपल्या मित्रमंडळींच्या सोबतीने आत्तापर्यंत रस्त्यावरील जवळपास ९ बेवारस,निराधार मनोयात्री रुग्णांना माहेरसह वेगवेगळ्या संस्थेत दाखल करणेकामी प्रयत्न केले आहेत.

सध्याच्या तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात मी व माझे कुटुंब यापलीकडे आपल्या आजुबाजुला काय होतयं,समाजात काय सुरु आहे याचेही भान हरवलेल्यांना ‘माणुसकी’ च्या या घटनेमुळे आजही कुठे तरी ‘माणुसकी जिवंत’असल्याचे ‘समाजभान’पहायला मिळाले.

याकामी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नागसेन लोखंडे,अखिल भारतीय सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शनीभाऊ शिंगारे,पत्रकार सचिन धुमाळ,नाथाभाऊ उंद्रे,शंकर पाबळे,‌ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गुडदे, रुग्णवाहिका चालक ऋषीकेश पवार यांचे सहकार्य लाभले.

Previous articleवाघोलीतील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Next articleसर्वांगीण विकास हा बालकांचा नैसर्गिक हक्क – सरपंच योगेश पाटे