पोलिस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस विभागाचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या इमारतीसोबतच आधुनिक सोईसुविधेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस विभागाच्या ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

कोरोनाच्या संकटकाळात पोलीस बांधव मोठ्या जिद्दीने, शर्थीने रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांनी याकामी त्यांना दिलेली साथ महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठीच पोलीस कोरोनाच्या कालावधीत ‘कोरोना’ विरूद्ध लढले. आपण सर्व मिळून कोरोनाची ही लढाई निश्चित जिंकू असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पुणे ग्रामीण पोलिस विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेला स्मार्ट पोलीसींग उपक्रम निश्चितच उपयुक्त आहे. स्मार्ट पोलीसींग उपक्रमामुळे पोलीस दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासोबतच पोलीस दल अधिक सतर्क होण्यास मदत होईल. अत्याधुनिक पोलीस स्टेशन, तंत्रज्ञान व दळणवळण, कामकाजात गतिमानता, जनतेशी पोलिसांचे सलोख्याचे संबंध, तपासात गतिमानता, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल व प्रशिक्षण यामुळे पोलिस दल अधिक सुसज्ज होण्यास मदत होईल तसेच पुणे जिल्हयातील पोलिस स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजात सुसुत्रता यावी तसेच वातावरण चांगले राहावे यासाठी स्मार्ट पोलीसींग उपक्रम राबविला जात आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावोगावी महिला सुरक्षा समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. यासोबतच स्मार्ट पोलीसींग उप्रकमाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच स्मार्ट पोलीसींग उप्रकमाअंतर्गत घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये निर्माण करण्यात आलेल्या सोई सुविधेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी सोर ग्रृपच्या सेजल रुपलग व समीर रुपलग या दाम्पत्यांचाही सत्कार करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलीस स्मार्ट पोलीसींग या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद मोहीते यांनी मानले.

Previous articleहुतात्मा राजगुरू महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleनारायणगाव ग्रामपंचायत येथे कोरोना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहन