नारायणगावात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा

नारायणगाव : किरण वाजगे

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नारायणगाव येथे तालुक्यातील सर्वात मोठा नेत्रदीपक कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. यावेळी नारायणगाव, चाळीसगाव, पारनेर, भोसरी, उत्तर प्रदेश, पिंपळवंडी, मुकाईनगर, सावरगाव, येडगाव व परिसरातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली.

कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या ८५ कुस्त्यांपैकी ९० टक्के निकाली कुस्त्या झाल्या. शेवटची कुस्ती खेड येथील अरुण खेंगले व पिंपळवंडीतील राहुल फुलमाळी यांच्यात बरोबरीने सुटल्यामुळे शेवटच्या निकाली कुस्तीचे अठरा हजार ५०० रुपयांचे मानधन दोनही मल्लांना समान वाटप करून देण्यात आले. शेवटच्या निकाली कुस्तीतील विजेत्या मल्लास शैलेश औटी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ जाहीर केलेली नारायणगाव वारूळवाडी हनुमान केसरी ही दीड किलोची चांदीची गदा दोनीही पहिलवानांना ठविभागून देण्यात आली. यावेळी सहभागी मल्लांना नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने दीड लाखांची बक्षिसे वाटप करण्यात आली.

श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने ह. भ. प. माऊली महाराज कुसुरकर यांचे तर दुपारी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज माळी यांचे काल्याचे किर्तन पार पडले. दिवसभरात पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोरोना नंतर पहिल्यांदाच होणारा हनुमान जन्मोत्सव जयंती सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला‌.

यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शिवदास तांबे, उपाध्यक्ष राजेंद्र कोल्हे, खजिनदार बाळासाहेब बनकर, सचिव रत्नाकर सुबंध, सहसचिव नवनाथ खेबडे, अनिल तात्या मेहेर, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, नारायणगाव सोसायटीचे चेअरमन संतोषनाना खैरे, व्हा. चेअरमन किरण वाजगे, युवा नेते अमीत बेनके, ज्ञानेश्वर ओटी, आशिष माळवदकर, हेमंत कोल्हे, सदस्य विनायक डेरे, शैलेश औटी, गोपीनाथ मेहेर, शशिकांत बनकर, सागर दरंदाळे उपस्थित होते.

कुस्त्याच्या आखाड्याची पंच म्हणून एच.पी.नरसुडे, राहुल नवले, मेहबूब काझी, आशिष कोल्हे, विनायक औटी, भीमराव पालवे, साहेबराव गाळव, ओमकार मेहेर, संतोष भालेराव, सचिन काशीद या शिक्षकांनी काम पाहिले.नारायणगाव येथील कुस्त्यांच्या आखाड्यात सायली कुरकुटे, शिवकन्या भोसले, कविता राजपूत, मोनिका चव्हाण, प्रेरणा हिंगे, स्वरा गाडे,भडांगे या मल्ल मुलींनी सहभाग घेतला.

Previous articleनारायणगावच्या मुक्ताई ,काळोबाच्या यात्रेत तमाशा सप्ताहसह, भव्य पालखी, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम, कुस्त्यांचा आखाडा रंगणार
Next articleवाकी बुद्रुक सोसायटीवर भैरवनाथ शेतकरी पॕनलचे वर्चस्व; १३/० ने दणदणीत विजय