केबल व कृषीपंप चोरी करणारी टोळी जेरबंद – गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

नारायणगाव:- (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्याच्या विविध भागात कृषी पंप व केबल चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ८ लाख ६८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार मुख्य आरोपी व तीन अल्पवयीन चोराट्यांच्या टोळीस जेरबंद करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चोरीला गेलेल्या मोटारी पुन्हा शेतकऱ्यांना देऊन त्यांना अनोखी भेट दिली आहे.

जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप म्हणजेच विद्युत मोटारी व केबल चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरून केबल व पाण्याच्या मोटारी चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी जुन्नर व खेड पोलिसांना कसून शोध करण्याच्या सूचना दिल्या होत्या‌. तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यानुसार केबल व मोटारी चोरी करण्यासाठी चोरटे पिकअप गाडीचा वापर करीत असल्याचे लक्षात आले होते.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुभम तोत्रे व भूषण पवार यांच्याकडे शेतीला पाणी देण्यासाठी वापरात असलेल्या मोटारींची विक्री करण्यासाठी ते नारायणगाव बस स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून साई उर्फ भूषण संदीप पवार (वय २२ वर्ष, राहणार पाटे खैरेमळा), शुभम सुभाष तोत्रे (वय १८ वर्ष, राहणार मंचर ता. आंबेगाव), विकी संतोष लोखंडे (वय २० वर्ष,राहणार वैद्यवाडी नारायणगाव) व तीन अल्पवयीन मुले यांची चौकशी केली असता त्यांनी केबल व पाण्याच्या मोटारी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यातील काही मोटारी नारायणगाव येथील कुकडी कॅनॉल येथील बंद खोल्यांमध्ये लपवून ठेवल्या तर काही मोटारी ओतूर येथील गुफरान बाबामियाँ शेख या भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून विविध कंपन्यांच्या आठ मोटारी, केबल, पिकअप, टाटा इंडिका व टाटा इंडिगो या गाड्यांसह ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर,राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, दिनेश साबळे, सचिन कोबल, मुकुंद कदम, दगडू विरकर, प्रसाद पिंगळे, आकाश खंडे यांनी ही कारवाई केली.

Previous articleजुन्नर तालुक्यात हरितसंकल्पाची गुढी
Next articleश्रीक्षेत्र ओझरला जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद