बैलगाडा शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करणार – खासदार डॉ अमोल कोल्हे

Ad 1

नारयणगाव (किरण वाजगे)-गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्या बाबतच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघावा यासाठी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज मुंबईमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावे, तसेच महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे चर्चा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती या बैठकीला उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.

या बैठकीला नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरोटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोडके, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ परकाळे, सहआयुक्त डॉक्टर प्रशांत भड, अवर सचिव श्री पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैलगाडा शर्यती बाबत अधिक बोलताना खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि तो प्राधान्याने सोडवण्यासाठी गेली अनेक दिवसांपासून राज्य शासन व केंद्रशासनाकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन ची परिस्थिती पाहता या सर्व बाबींना विलंब होत आहे. तरीदेखील बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न प्राधान्याने केले जातील असेही कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.