शिवरायां बद्दल तना-मनात प्रचंड आदर आणि प्रेम असल्याने शिवप्रेमी शिवभक्त खलिल महेमुद शेख यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी

उरुळी कांचन

येथील सर्पमित्र खलिल महेमुद शेख हे व्यवसायाने ट्रॅक्टर मेकॅनिक आहे. महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे सातवी, आठवी मध्ये शिकत असताना इतिहासाचे शिक्षक कै.रसाळ सर यांच्यामुळे मला इतिहासाची गोडी लागली. आणि त्यांच्या रसाळ वाणीने आणि शिकविण्याच्या अत्यंत उत्तम पद्धतीने डोळ्यासमोर ऎतिहासिक घटना हुबेहुब उभ्या रहायच्या, ते शिवकालातील घटना शिकवत असताना अंगावर रोमांच उभे राहायचे त्यातुनच मला छत्रपति श्री. शिवरायांचा ध्यास म्हणा वेड म्हणा निर्माण झाले. मग समविचारी मित्रां बरोबर गड किल्ले फिरु लागलो. किल्यावर गेल्यावर त्या ठिकाणी घडलेल्या घटना नजरे समोर उभ्या रहायच्या, छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांची नितीमुल्ये त्यांचे रयते बद्दलचे विचार आणि त्यांची सर्वगुण संपन्नता, त्यांच्या सहका-यांचा पराक्रम, आपल्या राजा साठी, स्वराज्या साठी त्यांनी केलेले बलिदान ह्या विषयी प्रचंड आकर्षण आणि आदर निर्माण झाला. मग मी भुकेल्या सारखा शिवकाला तील मिळतील ती पुस्तके, ग्रंथ, बखरी वाचायला लागलो. त्यातुनच मग शिवरायां बद्दल तना-मनात प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झाले. मग परिसरात साजरा केला जाणारा शिवरायांच्या, शिवकाळातल्या घटनेचा कोणताही कार्यक्रम असो त्याला हजेरी लाऊ लागलो, त्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊ लागलो. हे सर्व करताना शिवचरित्रा बद्दल प्रचंड ओढ निर्माण झाली. शाळा सोडली पोटापाण्याच्या उद्योगाला लागलो. पण शिवराय मनातुन गेलेच नाहीत, ते माझ्या रक्तातच भिनलेले होते. सतत व्यवसाय उद्योगातुन मुद्दामुन वेळ काढुन गड किल्ले फिरतच होतो, महाराजांच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट अधाश्या सारखी आत्मसात करत होतो. मग १५/१६ वर्षा पुर्वी स्वतः माझ्या घरी तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती करु लागलो. व आता गेल्या आठ वर्षा पासुन मी सार्वजनिक शिवजयंती साजरी करत आहे. प्रत्येक वर्षी काही तरी वेगळा उपक्रम असतो. मग त्यात महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग असोत , त्यांच्या सरदार, शिलेदार आणि मावळ्यांच्या पराक्रमांचे प्रसंग असोत. त्यांची चित्रे लाऊन रयतेच्या मनात शिवविचार जागृतीचे प्रयत्न अखंड पणे सुरु आहेत. ह्या शिवाय सोहळ्यास येणा-या प्रत्येक निमंत्रिकाला, मी दरवर्षी काहीना काही देत असतो. कधी लिंबु सरबत, कधी ताक तर कधी मठ्ठा, ह्या प्रयोजनाला गेल्या आठ वर्षात कधीच खंड पडला नाही. सुरवातीला माणसं जरा कमी प्रमाणात येत होती पण आता १०००/१५०० लोक येतात, सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत दिवसभर येत जात असतात आणि ह्या माझ्या कार्यक्रमात माझ्या घरा शेजारी रहाणारी काही तरुण मुलं आणि लहान लहान बच्चे कंपनी मला अनमोल मदत करतात. ह्या संपुर्ण नियोजनात येणा-या खर्चा साठी मी कोणा कडुन एक रुपया वर्गणी किंवा मदत घेत नाही. फक्त फायदा हा होतो की मला ह्या कामात जे सहकार्य मिळतं ते असे की मला लागणा-या गोष्टी मध्ये म्हणजे मांडव असेल बॅनर्स असतील खुर्च्या असतील किंवा मठ्ठा वगैरे असेल त्या किमतीत मला चांगली सवलत ते ते सहकारी देतात. त्यात ह्या वर्षी मी प्रत्येक पाहुण्याला एक एक तुळशीच रोप भेट देण्याचे ठरवुन ते पण प्रयोजन पार पाडलं आहे.आणि माझ्या ह्या उपक्रमास माझी बायको, ख-या आणि शब्दशः अर्थाने माझी अर्धांगिनी जरिना खलिल शेख हिचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असतो. बाहेर गावात परिसरात माझ्या नावाची चर्चा होत असेल कदाचित पण ह्या सोहळ्याची खरी मानकरी जर कोण असेल तर ती माझी जरिनाच आहे. तिच्या मदती शिवाय आणि सहका-या शिवाय ईतक्या वर्षा पासुन चाललेला हा सोहळा सफल होऊच शकला नसता.

दरवर्षी माझ्या शिवरायांच्या जयंती सोहळ्यास गावातील राजकिय सामाजिक व्यवसाईक छेत्रातील विविध मान्यवर आपली हजेरी लावतातच पण आसपासच्या गावातील, शेजारिल तालुक्यातील, जिल्ह्यातील जिल्ह्या बाहेरील अनेक मान्यवर, शिवराय भक्त पण आवर्जुन येतात. माझ्या राजांच दर्शन घेतात, माझ्या कुवती नुसार मी जे काही देईन तो महाराजांचा प्रसाद,आशिर्वाद मानुन स्विकारतात आणि पुढिल कार्यक्रमास नक्की येऊ असा शब्द देऊन आपल्या आठवणी मागे ठेऊन जातात.ह्या सगळ्या माझ्या माणसांच्या माझ्यावरील प्रेमाने, त्यांच्या सहका-याने भाराऊन मी गेल्या सहा वर्षा पुर्वी एक संकल्प सोडला होता, छत्रपति शिवरायांचे चरित्र हिंदीत लिहिण्याचा. माझ्या काही जवळच्या मित्रांच्या आणि शिवराय अभ्यासक सहका-यांच्या अनमोल मदतीने ते काम आज पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्या सर्वांची नावे मी आज जाहिर करणार नाही पण त्या सर्वांचा मी शतःश आभारी आहे.

हे शिवचरीत्र लिहिण्या मागची काही कारणं आहेत, त्यातील सर्वात महत्वाची दोन कारणं म्हणजे एक तर मी महाराजां वर लिहीलेली अनेक मान्यवरांची पुस्तकं वाचली आणि त्यावेळी मला वाटलं की माझ्या राजांच मी माझ्या स्वतः च्या आत्मीक समाधाना साठी चरित्र लिहाव आणि ते माझ्या संग्रही असाव आणि दुसरं कारण म्हणजे छत्रपती महाराज मला जे समजले, जसे कळाले तसे माझ्या नजरेतुन माझ्या लिखाणातुन शिवभक्तांना कळावेत. लवकरच शिवरायांच्या आशिर्वादाने हे शिवचरित्र रुपी पुस्तक जनते समोर येईल. आणि दरवर्षी प्रमाणे पुढच्या वर्षी पण, तद्हयात मी शिवजयंती साजरी करणारच आहे त्यात खंड पडणार नाही अशी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वजण प्रत्येक वेळी यालच ह्या बद्दल मला खात्री आहे असा विश्वास खलिल महेमुद शेख यांनी बोलवून दाखविला.

Previous articleशेतकऱ्यांसाठी ” कृषि निर्यात ” या विषयावर विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम
Next articleशेतकऱ्याला बोनस ऐवजी प्रति एकर मदत विचाराधीन;धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार