शिवरायांचे जल व्यवस्थापन

गणेश सातव ,वाघोली

आज २२ मार्च

जागतिक जल दिवस

कुठल्याही गड किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे. त्यात सह्याद्रीत व एकंदर भारतात चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय अतिशय काटेकोरपणे करत असत. शिवकाळात विजेचा शोध लागला नव्हता. त्यामुळे विद्युतपंपाने पाणी खेळवणे, हे त्या काळी शक्य नव्हते.

मात्र त्याही परिस्थितीत शिवनिर्मीत प्रत्येक गडकिल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर जर हल्ला झाला तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठी कसा राहील, याची योग्य ती काळजी शिवरायांनी घेतलेली आहे. त्याचे मुख्य कारण त्याकाळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साहाय्याने पाणीसाठा करता येऊ शकतो, हे तत्कालीन पाथरवटांच्या (खडक फोडणारी जमात) लक्षात आले होते. त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडूनच शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी अथवा हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाणी सतत पाझरत राहील याची व्यवस्था केली होती.

त्याचबरोबर अशा जलाभेद्य खडकांची जर मुबलकता आढळली तर त्यातले मधले खडक अलगद काढून किंवा त्यांना पाणी पाझरत राहील इतके तासून तलाव तयार केले व पाण्याची वर्षभर मुबलकता कशी राहील, याकडे विशेष लक्ष दिले. रायगडावरील गंगासागर तलाव, कोळींब तलाव, सज्जनगडावरील सोनाळे तलाव, प्रतापगडावरील रहाटाचे तळे, भवानी तलाव ही त्याची काही उदाहरणे आहेत.

त्याचबरोबर सपाट व नागरी वस्त्यांमध्ये शिवरायांनी विहिरी, तलाव, पाणवठे खोदून घेतले होते. रायगडावरील शिलालेखात रायगड बांधणा-या हिरोजी इंदुलकर यांनी.. ‘वापी, कुप, तडाग’ असा केलेला उल्लेख फार महत्त्वाचा आहे. राजधानी रायगडाच्या दृष्टीने पाणीसाठा गंगासागर, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, काळा हौद, कुशावर्त तलाव, चांभार टाके, हनुमान टाके अशा विपूल पाणी साठवण्याच्या जागा वर्षभर पुरेसा पाणी पुरवठय़ाच्या दृष्टीने शिवरायांनी गड बांधतानाच करवून घेतल्या होत्या. इतर किल्ल्यांवरही पाण्याची मुबलकता लोकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याचे नियोजन अगदी काटेकोर होते.

किल्ले मकरंदगड, राजमाची या गडावरून आजही पायथ्याशी असणाऱ्या गावात पाणीपुरवठा होतो.

Previous articleNESK 1999 च्या SSC बॅच च्या माध्यमातून ठिबकसिंचन मार्फत कायमस्वरूपी पाण्याची सुविधा
Next articleराजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगावात शिवजयंती उत्साहात