बिबट सफारीसाठी विधिमंडळात माझाच पाठपुरावा – माजी आमदार शरद सोनवणे

नारायणगाव : (किरण वाजगे)

गेल्या आठवडाभरापासून जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा मुद्दा थेट राज्यपातळीवर चांगलाच गाजतोय. यासाठी सोशल मीडिया मध्ये सुद्धा मोठी प्रतिक्रिया जनमान्यांसहित अनेकांनी दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. व ही बिबट सफारी जुन्नर मध्येच व्हावी असा शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला दिनांक २२ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे आज जाहीर केले.

यावेळी शरद सोनवणे म्हणाले की, २०१७ साली वन विभागाचे मुख्य सचिव जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची जागा पाहून गेले होते. त्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर २०१८ साली युती शासनाच्या वतीने बिबट सफारी होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील वन विभागाची जागा सर्वे करून सुनिश्चित करण्यात आली.

त्याबाबतचा अध्यादेश देखील युती शासनाच्या वतीने काढण्यात आला होता.
जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतानाच विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी बिबट सफारीसाठी कुठेही पाठपुरावा न करता साधे एक पत्रही कोणत्याच विभागाला, मंत्र्याला अथवा विधिमंडळात दिले नाही. बिबट सफारी नुकतीच बारामतीला मंजूर झाली. त्याला निधी देखील मंजूर झालला. त्यानंतर विद्यमान आमदार बेनके यांना जाग आली. अशी टीका देखील सोनवणे यांनी केली.
बिबट सफारीचा लढा सर्वसामान्यांनी मनावर घेतला असून कोणत्याही परिस्थितीत बारामतीला आम्ही बिबट सफारी होऊ देणार नाही. असा इशारा शरद सोनवणे यांनी दिला.

दरम्यान पिंपळवंडी येथील रायगड निवासस्थानात आयोजित केलेलेल्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, बाजार समितीचे उपसभापती दिलिप डुंबरे, पंचायत समिती सदस्य जिवन शिंदे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

संभाव्य बिबट सफारी बाबत माजी आमदार शरद सोनवणे यांनी नेमकी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचेच असल्यामुळे विद्यमान आमदार अतुल बेनके हे बारामतीला मंजूर झालेल्या अथवा होणाऱ्या संभाव्य बिबट सफारीला तीव्र विरोध करू शकणार नाही. म्हणून मला शासन निर्णय बदलत नाही तोपर्यंत उपोषणाला बसावेच लागेल. या पत्रकार परिषदेत माजी आमदार सोनवणे यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्यावर देखील टीका केली.

Previous articleगणेश रत्नपारखी यांचा राष्ट्रीय अक्कलकोट समाजभुषण पुरस्काराने गौरव
Next articleस्व.स्वप्निल कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धा