अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यामुळे श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड

नारायणगाव ( विशेष प्रतिनिधी)

नारायणगाव विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये शेवटचे काही दिवस शिल्लक असताना आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत आली आहे. याला कारणही तसेच आहे दोन्हीही पॅनल कडून आरोप-प्रत्यारोप होत असताना मतदार राजा नेमके आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार हे येत्या १३ तारखेला स्पष्ट होणार आहे. असे असले तरी मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास आघाडीच्या वतीने विजयाचा दावा केला जात आहे. याला कारणही तसेच आहे शेतकरी विकास आघाडी च्या इतर मागासवर्गीय गटातून अरुण आबा कोल्हे हे बिनविरोध निवडून गेले आहे तर महिलांच्या दोन राखीव जागांसाठी शेतकरी परिवर्तन पॅनल च्या वतीने केवळ एकच महिला उमेदवार दिल्याने येथेही एक महिला उमेदवार शेतकरी विकास पॅनलची निवडून आल्यात जमा आहे. त्यातच भर म्हणून की काय अपक्ष उमेदवार गणेश जनार्दन वाव्हळ यांनी शेतकरी विकास पॅनलला जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

यामुळे शेतकरी विकास पॅनल निर्णायक आघाडी घेईल हे सांगण्यास कोणता भविष्यवेत्ता आणण्याची गरज नाही.
दरम्यान श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या वतीने गुरुवार दि.१० रोजी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. या पॅनलच्या विरोधी निवडणूक लढवणा-या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या आरोपांना सरपंच योगेश पाटे व पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे यांनी जशास तसे व परखड उत्तर दिले आहे.वारूळवाडी व नारायणगाव च्या सरपंचांनी सोसायटीची ही निवडणूक लादली असून जर त्यांनी मनात आणले असते तर ते ही निवडणूक बिनविरोध करू शकले असते.

मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यास दोन्ही सरपंच अपयशी ठरले या आरोपावर सुमारे पाच दिवसानंतर सरपंच योगेश पाटे यांनी गणेश वाजगे, भागुजी पानसरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच पाटे यांनी गणेश वाजगे यांना तीन अपत्य असताना आम्ही अर्ज छाननी मध्ये त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. तसेच संस्थेचे माजी चेअरमन भागुजी पानसरे यांनी रेशन घोटाळा केल्यामुळे ते अडचणीत सापडले होते. असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे भटक्या जाती जमातीचे उमेदवार येल्लू लोखंडे हे शासनाचे लाभार्थी (रेशन दुकानधारक) आहेत. त्यांच्यावर अर्ज छाननी मध्ये आक्षेप घेतला असता तर ते देखील निवडणुकीला अपात्र ठरले असते. असाही आरोप सरपंच पाटे यांनी केला आहे. या विषयावर सरपंच योगेश पाटे व पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की वारूळवाडी गावातून समोरच्या पॅनल ला सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार देखील उभा करता आला नाही. त्यामुळे येथील मतदार शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने राहणार आहेत. या निवडणुकीत पारंपरिकरीत्या गावातील सर्व जथ्यांना उमेदवारी देण्यात विरोधी पॅनल अपयशी ठरले आहे. शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित कसा आहे, याबाबत त्यांना विचारले असता पाटे म्हणाले की, त्यांचे काही उमेदवार आता एक तरी मत मला द्या बाकीची मत त्यांना द्या असा प्रचार करू लागले आहेत. यामुळे आमच्याच कपबशीमध्ये आम्ही विरोधकांना चहा पाजणार असा दावा सरपंच योगेश पाटे यांनी केला आहे.

Previous articleअष्टापुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वाढदिवसाचा अनोखा उपक्रम
Next articleखासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; पुण्यात ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प साकारणार!