छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा गुलाब वाघमोडे तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड

उरुळी कांचन

तेरावे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गुलाब वाघमोडे यांची तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सासवड येथे शनिवार दि १२ मार्च २०२२ रोजी संमेलन होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला डॉ भालचंद्र सुपेकर, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, रवींद्र फुले, अमोल बनकर, दत्ता होले, श्री खेनट, अरविंद जगताप, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.

श्री वाघमोडे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करीत आहेत. रानभैरी या त्यांच्या आत्मकथन ग्रंथाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. भटके विमुक्त जागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सामाजिक प्रश्नावर सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठात महिलांच्या समस्या वर आयोजित चर्चा सत्रात वीस देशातील प्रतिनिधी मध्ये त्यांचा समावेश होता. परिवर्तन चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. कलंक, माणूस शोधताना या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून नियतकालिके, वृत्तपत्र मध्ये त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. भारिप बहुजन महासंघाचे ते पुणे लोकसभेचे २००९ चे उमेदवार होते. यापूर्वी प्रा नामदेवराव जाधव, भा.ल. ठाणगे. रा. आ. कदम. अनंत दा रवटकर, डॉ ताकवले, बाबासाहेब सौदागर, आकाश सोनवणे, श्रीराम पचींद्रे छिन्द चींद्रे, शरद गोरे, डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

श्री कड हे सामाजिक क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून ग्रंथालय चळवळ रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम करीत आहेत . ते सिव्हील इंजिनिअर असून पुणे जिल्हा ग्रंथालय संघावर पदाधिकारी आहेत.

श्री कड म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत राज्यातून येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत आहे. संमेलन यशस्वी होण्याचा आम्ही प्रयत्न करु. दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभरातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत.

Previous articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार  प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना जाहीर
Next articleयेलवाडी येथे मोफत इ श्रम कार्डचे वाटप