निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न

पुणे : संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनी दि.२३ फेब्रुवारी, २०२२ रोजी निरंकारी सत्संग भवन गंगाधाम, बिबवेवाडी या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या परिसरातून ४१६ व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. जवळपास १९१ गरजू रुग्णांना मिशनच्या वतीने मोफत औषधे व चश्मे वाटण्यात आले. एच व्ही देसाई हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजच्या दिवशी संपूर्ण भारतात १६ राज्यात ६१ निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ज्या नेत्ररुग्णांच्या बाबतीत मोतीबिंदू निष्पन्न होईल त्यांचे ऑपरेशन सरकारी इस्पितळांमध्ये करण्यात येणार आहे.

याचबरोबर ज्या ठिकाणी मिशनची सत्संग भवन आहेत त्या ठिकाणच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वांना विदितच आहे, की निरंकारी बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या सान्निध्यात संत निरंकारी मिशनने आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगाला प्रेम, दया, करुणा, एकत्व यांसारख्या उदात्त भावनांशी जोडून भिंतीविरहित जगाची परिकल्पना साकार केली. त्यांनी आपल्या भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच मानवता व प्रकृतीची सेवा करत आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली.

या व्यतिरिक्त कोरोनाच्या कालखंडात जेव्हा भारतभर इस्पितळांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा मिशनच्या वतीने ‘वननेस वन परियोजने अंर्तगत २१ ऑगस्ट, २०२१ रोजी संपूर्ण भारतात जवळपास ३५० ठिकाणी दिड लाखाच्या आसपास वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षे दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचाही संकल्प करण्यात आला.

हेच महाअभियान पुढे घेऊन जात असताना मिशनच्या सेवादारांकडून आजच्या दिवशी कोरेगाव मूळ ,उरुळीकांचन या ठिकाणच्या ‘ वननेस वन ‘ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी ७५०० वृक्ष लावण्यात आले .अजून २५०० वृक्ष पुढील चार दिवसात लावण्यात येणार आहेत.

याचबरोबर खुटबाव येथील प्रकल्पामध्ये २६८५ तसेच कामशेत आणि पाषाण येथे प्रत्येकी २०० वृक्ष लावण्यात आले . ज्यायोगे प्रदूषणाचा स्तर कमी होऊ शकेल आणि प्राणवायुची निर्मिती अधिकाधिक प्रमाणात होऊ शकेल जो मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. अशी माहिती संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी श्री.ताराचंद करमचंदानी यांनी दिली. या सर्व उपक्रमांचे आयोजन कोविड-१९ च्या दिशा-निर्देशांचे पालन करत करण्यात आले.

Previous articleमराठी भाषा गौरव दिन व शुभेच्छा समारंभ संपन्न
Next articleआंबेगाव तालुक्यात वन विभागामार्फत आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे: ट्रायबल फोरमची मागणी