विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रमात ‘स्वसंरक्षण’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

उरुळी कांचन

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन, (ता.हवेली) विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रमात ‘स्वसंरक्षण’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बोत्रे अमोल (विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले. त्यांनी निर्भय कन्या अभियानाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. या शिबिरात कु.गीता अर्जुन कोकाटे (सनशाईन मार्शल आर्ट) यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. एकविसाव्या शतकात मुली सर्व क्षेत्रात मुली अग्रसेर असताना स्वसंरक्षणाच्या बाबतीतही सक्षम असायला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे किती गरजेचे आहे हे विद्यार्थीनीना पटवून दिले.

अध्यक्षीय मनोगत मांडत असताना प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे हे समजावून सांगितले. दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाच्या गीता अर्जुन कोकाटे, पायाल धुमाळ, अश्विनी गिरी आणि अस्मिता दाभाडे (सनशाईन मार्शल आर्ट) यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सहभागी विद्यार्थीनीना प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेत ६८ विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शिंदे ए. एस.(राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले तर आभार प्रा. मासळकर एस.डी. यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा.कानकाटे व्ही. एन., प्रा.ढोणगे एस.एस., प्रा.शेख के. ए. एच, प्रा.बारटक्के आर. जी., श्री. बगाडे एम.आर., विशाल महाडिक यांनी प्रयत्न केले.

Previous articleअद्वैत क्रीडा केंद्राच्या वतीने क्रिडा रत्न पुरस्कारांचे वितरण
Next articleयुवासेनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी प्रताप कांचन