खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतील ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाची भर टाकणारा – अजितदादा पवार

पुणे – ‘इंद्रायणी मेडिसिटी’ हा पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाची भर टाकणारा प्रकल्प असून तो झालाच पाहिजे अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज प्रकल्प सादरीकरण बैठकीत मांडली. तर हा प्रकल्प आकारास आला तर देशासाठी पथदर्शी प्रकल्प ठरेल असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी ‘इंद्रायणी मेडिसिटी’ प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘इंद्रायणी मेडिसिटी’ प्रकल्पाच्या सादरीकरणाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रकल्पाचे मनापासून कौतुक केले. तसेच हा प्रकल्प व्हायलाच पाहिजे असे सांगून त्यासाठी पुढील कार्यवाही कशाप्रकारे व्हावी याचे मार्गदर्शनही केले. या बैठकीला अपर मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, देवाशिष चक्रवर्ती (मुख्य सचिव, नियोजन), नीरज धोटे (प्रधान सचिव, विधी व न्याय), राजगोपाल देवरा (प्रधान सचिव, वि. सु.), श्री. रामास्वामी (आयुक्त, आरोग्य), सुधीरकुमार बुक्के (धर्मादाय सहआयुक्त) आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, विकास ढगे पाटील आदी उपस्थित होते.

कोविड १९ च्या जागतिक महामारीमुळे गेली २ वर्षे आरोग्यसेवेवर प्रचंड ताण आला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह साधे बेड मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज असल्याची भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी आढावा बैठकीत सातत्याने मांडली होती. या संदर्भात केवळ भूमिका मांडून ते स्वस्थ बसले नाहीत तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या सहकार्याने ६ मेडिकल कॉलेज व १९ सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचा ‘इंद्रायणी मेडिसिटी’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना मांडली. गेल्या वर्षभरापासून डॉ. कोल्हे यांचे काम सुरू होते.

सह मेडिकल कॉलेज व १९ सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचा हा भव्य प्रकल्प खेड तालुक्यात उभारण्यासाठी आवश्यक जागांच्या पर्यायांवर काम सुरू आहे. मात्र इतका मोठा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य आवश्यक असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रकल्पाचे सादरीकरण केले. आरोग्यमंत्री टोपे यांनी या ‘इंद्रायणी मेडिसिटी’ संकल्पनेचे स्वागत केले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात ही सादरीकरण बैठक पार पडली.

या संदर्भात खासदार डॉ कोल्हे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मनावर घेतल्यावर राज्यातच नव्हे तर देशातील पहिला ठरावा असा हा प्रकल्प नक्की आकारास येईल असा विश्वास असून ‘इंद्रायणी मेडिसिटी’ प्रत्यक्षात आल्यास हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरेल असे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

Previous articleनिवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा
Next articleउंडवडी विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध ; १११ वर्षांची परंपरा कायम