भैरवगडावरून शिवरायांना मानाचा मुजरा : टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भैरवगडावरून शिवप्रतिमेस केलेले वंदन ठरले लक्षवेधी

राजगुरूनगर – सह्याद्रीच्या खोऱ्यातील प्रस्तरारोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा ४५० फूटी मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) बाणवीर टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या साहसी गिर्यारोहकांनी सर करीत भगवा स्वराज्य धव्ज हाती घेत, शिवरायांना मानाचा मुजरा करीत, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवराय”, ” हर हर महादेव” या घोषणा देत मोठ्या उत्साहात शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. या ठिकाणी गडावरून खाली सोडण्यात आलेल्या शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केलेला मानाचा मुजरा लक्षवेधी ठरला.

या मोहिमेची सुरवात ठाणे जिल्ह्यातील मुरमाड तालुक्यातील मोरोशी गावातून झाली. घनदाट जंगलातून दोन तासांची पायपीट केल्यावर भैरवमाची येथून भैरवगडाचे रांगडे रूप नजरेस पडते. येथून भैरवगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर शिवगर्जना देऊन प्रस्तरारोहणास सुरवात झाली.

सुरवातीचा तब्बल ३०० फूटी प्रस्तरारोहण मार्ग हा ९० अंशातील चढाईचा आहे. त्यानंतर एक ट्रॅवर्स मारल्यावर क्रॅकचा टप्पा पार करावा लागतो. पुढे ७० अंश कोणात शेवटचा १०० फूटी मातीचा घसरडा टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

ओव्हरहँग, ट्रॅवर्स, ओपन बुकशेल्फ / क्रॅक, स्क्री (मातीचा घसरडा टप्पा) अशी अनेक आव्हाने असणारा आणि मानसिक व शारीरिक कसोटी पाहणारा ४५० फूटी उंच अजस्त्र आणि खडी कातळभिंत असणारा कठीण प्रस्तरारोहण मार्ग, काळजाचा थरकाप उडवणारी चित्त थरारक चढाई, सरळसोट कातळकडा, सोसाट्याचा वारा अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॉकी साळुंखे आणि सहाय्यक संघात असणाऱ्या भूषण जाधव, समीर देवरे, अनिल चोधरी, महेश जाधव आणि डॉ.समीर भिसे या साहसी गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते करीत अनोख्या पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Previous articleआप्पासाहेब डोंबे यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसपदी निवड :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरू येथील पुतळ्यासमोर पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवरायांना दिली मानवंदना