बी.डी.काळे महाविद्यालयात सावित्री महोत्सवाचे आयोजन

 

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील प्राध्यापक ज्ञानवर्धक सभा आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार नुकतेच सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव होते.

 

अध्यक्षीय भाषणात त्यांनी या महोत्सवाची उपयुक्तता विशद करून या कार्यक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचे “सावित्रीबाई फुले यांचे साहित्य” या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी डॉ.वाल्हेकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यफुले या कवितासंग्रहातून समकालीन शिक्षण, जातिभेद,निसर्ग आणि मानव यांचे अन्योन्य संबंध,बळी स्रोत इ.विषयांची चर्चा त्यांनी केलेली आहे. आत्मकथनपर रचनेत माझी जन्मभूमी,आमची आऊ, जोतिबांना नमस्कार, संसाराची वाट,जोतिबाचा बोध, सावित्री – जोतिबा संवाद इ. विषय रेखाटलेले आहे.याशिवाय महान ऐतिहासिक महापुरूषांबद्दलचा आदर व्यक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी, राणी छत्रपती ताराबाई यांच्या जीवनावर काव्यलेखन केले आहे.चिंतनात्मक काव्यलेखनात शिक्षणासाठी जागे व्हा!,तयास मानव म्हणावे का?,इंग्रजी माऊली,शुद्र शब्दाचा अर्थ,श्रेष्ठ धन,गुलाबाचे फुल,बोलकी बाहुली,तेच लग्न,नवस,बाळास उपदेश इ.काव्यरचना लिहिलेल्या आहेत. काव्यफुले या कवितासंग्रहाच्या आधारे आधुनिक मराठी काव्यक्षेत्रातील सावित्रीबाई फुले या साहित्यिकांच्या अग्रणी ठरतात.अग्रस्थानी ठरतात. काव्यफुले या कवितासंग्रहातून सावित्रीबाई फुले यांनी त्या काळातील शिक्षण, विद्या, संसाराची वाट, माणूस आणि निसर्ग, अंधश्रद्धा निर्मूलन, इंग्रजांचे शासन,तत्कालीन ग्रामीण जीवन अधोरेखित केलेले आहे.याशिवाय बावनकशी सुबोध रत्नाकर या ग्रंथातून त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर खंडकाव्य लेखन केलेले आहे.सावित्रीबाईंची गाजलेली भाषणे व पत्रे यामध्ये ही उद्योग,विद्यादान,सदाचरण, व्यसने,कर्ज या विषयावर सावित्रीबाईंची भाषणे गाजलेली आहेत.

या सावित्री महोत्सवात महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.बी.ए.(सी.ए) या वर्गातील विद्यार्थीनी कु. सेजल विजय काळे हिने ग्रामीण कथाकार शंकर पाटील लिखित ‘धिंड’ या कथेवरील आधारित एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.पोपटराव माने यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ.चांगुणा कदम यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ.गुलाबराव पारखे यांनी आभार मानले.

Previous articleपेडगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटन
Next articleइनरव्हील क्लब व आदिशक्ती महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कुंकू व आरोग्य शिबीर उत्साहात