कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकावरील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील ( नव्याने विभाजन करून ती हवेली तालुक्यासाठी बाजार समिती राहणार असणारी ) प्रशासक हटवून तेथे शासन नियुक्त प्रशासक मंडळ आणून त्यावर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची, नातेवाईकाची वर्णी लावण्याची धडपड सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मधील सहभागी घटक पक्षाचे नेते / कार्यकर्ते करीत आहेत व त्यासाठी प्रशासकाचा कारभार भ्रष्टाचारी असल्याची आवई उठवून तवा तापवून त्यावर आपली पोळी भाजून मनसोक्त ताव मारायचा असा प्रकार सध्या चालू आहे तो थांबला पाहिजे, प्रशासक हटवायचाच असेल तर उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन त्यावर लोकशाही मार्गाने संचालक मंडळ बसवावे व ज्यांनी गैरकारभार केला आणि त्यांच्या चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिध्द होऊन वसुली करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती तिला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली ती विद्यमान सहकार व पणन मंत्र्यांनी उठवावी म्हणजे दोषी संचालकांकडून पैसे वसुलीची प्रक्रिया प्रशासकांना चालू करता येईल अशी मागणी हवेलीतील जुन्या जाणत्या शेतकऱ्यानी व व्यापाऱ्यांनी नांव न छापण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलताना केली आहे. हवेली तालुक्याची मुळची असणारी व त्यासाठीच कै. अण्णासाहेब मगर यांनी स्थापन केलेली ही समिती उत्पन्नाच्या व व्यापाराच्या बाबतीत आशिया खंडात १ नंबरची राहिली आहे.

सन २००५ मध्ये या समितीवर कार्यरत असलेल्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराने समितीला सुमारे ७ ते ८ कोटी रुपये तोट्यात घालवल्याने संचालक मंडळाला बरखास्त करून तेथे प्रशासकाची नेमणूक केली गेली तदनंतर आत्तापर्यंत त्यावर प्रशासक …. सरकार नियुक्त प्रशासक मंडळ ….. सरकार नियुक्त संचालक मंडळ…….व पुन्हा प्रशासक असा जवळपास १५ वर्षाचा कालावधी लोटला पण लोकशाही मार्गाने निवडलेले संचालक मंडळ या संस्थेला काही मिळेना मग सत्ता आघाडीची असो, युतीची असो वा महाविकास आघाडीची असो अशी भावना जुने बुजर्ग शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत. आज मितीला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसह २०० कोटीच्या ठेवी जमविलेल्या प्रशासकाला दूर करून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ आणण्याचा घाट घातला जात आहे यात नेमके शेतकऱ्याचे कोणते हित लपले आहे ? का कमिटीच्या असलेल्या सुमारे २०० कोटींच्या ठेवीवर डोळा ठेवून हा बदल करायचा आहे असा सवाल हवेली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.