खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ऋतुजा आमले हिचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बोतार्डेच्या (आमलेवाडी) ऋतुजा प्रकाश आमले हिचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

जुन्नर तालुक्यातील आदिवासी ‘पेसा’ क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर ९९.९९ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार ९९.६० टक्के गुण मिळवून पहिलं स्वप्नं पूर्ण केले. अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी तातडीने आपल्या ‘जगदंब प्रतिष्ठान’चे श्री. विजय कोल्हे, महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार धर्मेंद्र कोरे, अतुल कांकरिया, अतुल आहेर, जयेश कोकणे, शेखर शेटे, आशिष हांडे, तेजस झोडगे आदी सहकाऱ्यांना ऋतुजाच्या घरी पाठवले. श्री. विजय कोल्हे यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची दखल घेऊन तातडीने ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

या संदर्भात खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

Previous articleकृष्णाई विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुषार दादा थोरात यांची बिनविरोध निवड
Next articleदावडी गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास बोत्रे व व्हाईस चेअरमनपदी विजय ओव्हाळ यांची बिनविरोध निवड