यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सोपानराव तात्याबा उंद्रे पाटील यांचे निधन

उरुळी कांचन

माजी संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना तथा प्रथम उपसरपंच मांजरी खुर्दचे सोपानराव तात्याबा उंद्रे पाटील
यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. मांजरी खुर्द गावच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

पूर्व हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द गाव च्या प्रथम उपसरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. तदनंतर त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांच्या सहकार्याने भोलेनाथ पाणीपुरवठा सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेचे ते संस्थापक चेअरमन होते. या संस्थेच्या माध्यमातून गावातील तब्बल 50 टक्के क्षेत्रास नदीचे पाणी प्राप्त झाले व हे सर्व क्षेत्र बागायती झाले. तब्बल 45 वर्ष ही संस्था कार्यरत होती.

नंतर 1984 ते 1989या काळात यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य केले ,यादरम्यान तरुणांना रोजगार मिळावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. स्वतःचे शिक्षण चौथी असताना देखील शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना प्रचंड आस्था होती. मांजरी खुर्द ते त्याकाळी हायस्कूल नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी मांजरी बुद्रुक येथे जावे लागत असे, त्यावेळी नदीवर मातीचा कच्चा पुल होता.

पावसाळ्यात हा पूल वाहून गेल्यानंतर जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागत होता, त्यामुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित राहू लागले, मुलींसाठी तर शिक्षण हे एक स्वप्नच होते, ही अडचण ओळखून मांजरी गावात हायस्कूल असावे म्हणून श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने गावात हायस्कूल उभे केले आज तेच हायस्कूल गावात अण्णासाहेब मगर विद्यालय म्हणून गावच्या प्रवेशात दिमाखात उभे आहे या हायस्कूलचे त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे अध्यक्ष म्हणून जबाबदारीने काम पाहिले.
गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी देखील त्यांनी भरीव योगदान दिले.

गावात श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक दिंडी च्या स्थापनेपासून ते दरवर्षी पायी वारी करणे, विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, पंढरपूर येथे धर्मशाळेचे बांधकाम करणे या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता, तसेच या प्रत्येक कामामध्ये त्यांनी एक देणगीदार म्हणून देखील मोठा वाटा उचलला. आजतागायत आळंदी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही.

आमच्या कुटुंबास सामाजिक व राजकीय व शैक्षणिक क्षेत्राचे बाळकडू त्यांनीच पाजले. आयुष्यभर ते स्वाभिमानाने, करारीपणा ने सरळ मार्गाने चालत राहिले.त्यांची उणीव न भरून निघणारी आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे यांचे आजोबा होत.

Previous article‘माहेर’ संस्थेचे कार्य सामाजिक संस्था व समाजासाठी आदर्शवत – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Next articleश्री क्षेत्र ओझर येथे लेझर फाऊंटन शो कार्यक्रमाचे आयोजन