सावरदरी गावात स्वच्छतेतून समृध्दीकडे- एक पथदर्शी प्रकल्प

राजगुरूनगर- ग्रामपंचायत सावरदरी (ता. खेड) येथे सन २०१६-१७ साली सावरदरी गावाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या केंद्रित व विकेंद्रित पद्धतीने ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्पास फोर्ब्स मार्शल फाऊंडेशन यांच्या सहाय्याने व नो हाऊ फाउंडेशन- इनोरा पुणे संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने स्वच्छ भारत ग्रामीण अभियान सुरु होण्याच्या खूपच आधी नियोजन करून सुरूवात झाली. सध्याला सावरदरी गावातील लोकसंख्या १५००० च्या जवळपास असुन अंदाजे ४००० कुटुंबे व गावातील व्यावसायिक ठिकाणे (हॉटेल्स/कॅन्टीन) येथे निर्माण होणाऱ्या रोजच्या २००० किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.

प्रामुख्याने सावरदरी गावातील असणारे ग्रामस्थ, महिलावर्ग, भाडेकरू, हॉटेल्स, दुकाने, मंदिरे, यात्रा, जत्रा, उत्सव, दवाखाने तसेच चिकण-मटन विक्रीची ची दुकाने या गोष्टींचा सर्व अंगाने विचार करून गावाच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कंपोस्ट प्रकल्प करण्याचा निर्णय हाती घेतला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

प्रथम जेथे कचरा निर्माण होत आहे तेथेच कचरा विभाजन करायला सुरुवात केली. विभाजन केलेला कचरा ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरात दोन बकेट दिल्या. त्यानंतर प्रत्यक्ष गावात राहणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन कचरा विभाजन या विषयासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जन जागृती केली. त्यानंतर योग्य बांधणीच्या घंटागाडी मध्ये दोन कंपार्टमेंट करून अनुभवी सुपरवायझर व स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने विभाजित कचरा संकलन करण्यास सुरुवात झाली. गावातील रहिवासी यांच्याकडून विभाजित कचरा मिळायला लागल्यानंतर केंद्रित व विकेंद्रित कंपोस्ट प्रकल्पास खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली.

विभाजन करून आलेला ओला कचरा जवळच केंद्रीत पद्धतीने जमिनीमध्ये ट्रेंच करून जिवाणू कल्चर चा वापर करून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करून घेऊन त्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करून परिसरात असणाऱ्या रोपांना व झाडांना वापरून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने व फोर्ब्स मार्शल फाऊंडेशन ने केलेला आहे.

सुरू असलेल्या या प्रकल्पावर सुका कचरा विभाजन करण्यासाठी शेडची व्यवस्था केलेली असून त्यामध्ये आलेल्या सुक्या कचऱ्याचे पुढील विभाजन व वर्गवारी केली जाते. उदाहरणार्थ काच,फायबर,लोखंड, ई वेस्ट अशाप्रकारे कचऱ्याचे विभाजन व कचऱ्याची वर्गवारी करून हा वर्गीकृत सुका कचरा पुनर्निर्मिती साठी पाठवला जात आहे.

तसेच या सुक्या कचऱ्या मधून निघणारा निरुपयोगी कचरा व घरांमधील सॅनिटरी कचरा देखील निसर्गाला हानी न पोहोचवता शास्त्रीय पद्धतीने लँडफिल करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे.

आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थ येऊन प्रकल्पाची पाहणी करून जात आहेत आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प खूपच उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. भविष्यात हा प्रकल्प असाच ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य कडून ग्रामस्थांच्या मदतीने सुरु राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Previous articleजवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागल्याची समजताच माजी आमदार अशोक टेकवडे धावले शेतकऱ्यांच्या मदतीला
Next articleदौंड शहरात महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळा उभा करा : काँग्रेस शहर मागणी