होम स्टे (निवास) व न्याहारी आणि महा भ्रमण योजना संदर्भातील एक दिवसीय पर्यटन कार्यशाळा संपन्न

गणेश सातव,वाघोली,पुणे

शाश्वत पर्यटन स्वयंरोजगार अभियानाअंतर्गत ‘होम स्टे निवास व न्याहारी आणि महा भ्रमण’ योजनेच्या संदर्भात एक दिवसीय पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र, (राजुरी) जुन्नर या ठिकाणी पार पडली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे विभाग आणि पराशर कृषी व संस्कृती पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक दिवसीय पर्यटन कार्यशाळेसाठी २२ प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे या कार्यशाळेत ग्रामीण तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. पुणे,जुन्नर,दौंड,नगर,संगमनेर,सिन्नर अशा विविध ठिकाणांहून तरुणवर्ग या कार्यशाळेत सहभागी झाला होता. निमशहरी व ग्रामीण भागातील पर्यटनाच्या व्यवसायिक संधींबाबत तरुणवर्ग जागृत होत आहे ही खूपच सकारात्मक बाब या निमित्ताने निदर्शनास आली.या एक दिवसीय पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे सर दिवसभर उपस्थित होते. त्यांनी ‘निवास व न्याहरी आणि महाभ्रमण’ योजनेसंदर्भात उपस्थित प्रशिक्षणार्थी तरुणांना मार्गदर्शन केले.

 

पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचे संचालक तथा पर्यटन प्रशिक्षक व सल्लागार मनोज हाडवळे यांनी होम स्टे संकल्पना, फार्म स्टे संकल्पना, कृषी पर्यटन व इतर मातीशी निगडित पर्यटन संकल्पनांविषयी मार्गदर्शन केले.शाश्वत पर्यटन स्वयं रोजगार अभियानाअंतर्गत दर महिन्याला विविध पर्यटन संकल्पनांच्या व्यवसायिक संधी, शासकीय योजना यासंदर्भात प्रशिक्षणे आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती हचीको-टुरिझम ट्रेनिंग व कन्सल्टन्सी संस्थेमार्फत देण्यात आली. पुढील काळात ही पर्यटन प्रशिक्षणे राज्यातील विविध ठिकाणी, विविध संस्थांसोबत,विविध व्यासपीठांवर आयोजीत करण्यात येणार आहेत.

पुढील दशकभरात निमशहरी व ग्रामीण भागातील पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि त्या अनुषंगाने शाश्वत विकास होणं ही ग्रामीण अर्थव्यवस्थेतील गरज आहे. फेब्रुवारी महिन्यातील पर्यटन प्रशिक्षणाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

Previous articleनिधन वार्ता- विश्वासराव(आण्णा) बोत्रे यांचे निधन
Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक- विकास दांगट-पाटील