अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी लेखणीच्या तलवारीचा वापर करते- ज्येष्ठ आदिवासी कवयित्री मा.उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत नुकतेच व्याख्यानाचे आयोजन झूम मंचावर आॕनलाईन केले होते.

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव हे होते. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत मराठी विभागाने या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये मा.उषाकिरण आत्राम यांची बाजा ही आदिवासी जीवनावर आधारित कथा असल्याकारणाने बाजा या कथेची निर्मितीप्रक्रिया या विषयावर धनेगाव गोंदिया या ठिकाणच्या ज्येष्ठ आदिवासी कवयित्री मा.उषाकिरण आत्राम यांचे व्याख्यान नुकतेच विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाले.

आपल्या भाषणात म्हणाल्या की,मी माझ्या कथासाहित्यातून भांडवलदार या प्रस्थापित वर्गाकडून आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे चित्रण साहित्यातून केलेले आहे. मानवी जीवनातील सत्य घटना माझ्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहे.माझ्या साहित्यातील घटना, माझ्या साहित्यातील पात्रे, ही काल्पनिक नसून ती वास्तव जीवनातील आहे. माझ्या साहित्यातील विषय आणि आशय माझ्या परिसरामध्ये अनुभवले आहेत. माझ्या साहित्यामध्ये केवळ आदिवासी समाज आणि आदिवासी समाजातील स्त्री पुरुष हे तर येतातच. परंतु बहुजन समाजातील उपेक्षित असलेल्या स्त्रियायाही माझ्या लेखनात येतात.माझ्या घरात परंपरेने लिखाणाची कोणतीही परंपरा नाही.माझे आई-वडील अशिक्षित होते.शिक्षण आणि लेखन करा असं सांगणारे कोणीही नव्हते. अशा अवस्थेमध्ये मी साहित्य लेखन केलेले आहे. आज मानवी हक्कांवर आघात केले जात आहेत. गरिबीचे भांडवल केलं जात आहे. मला जे दिसतं, मी जे अनुभवते तेच माझ्या लेखनामधून येते. अन्यायाचा प्रतिकार करणारी पात्रे मी माझ्या कथासाहित्यातून पेन्टा या शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रेखाटली आहे.पेन्टा ही परिवर्तनाची नांदी आहे.ज्या वेठबिगारी आणि सावकारशाहीने आपल्या बापावर निर्घुण अत्याचार केले,ती वेठबिगारी कायमची संपवण्यासाठी पेन्टा आदिवासींना संघटित करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी समाजाने मान्यता दिलेल्या गोटूल संस्कृतीला हिणवले जात आहे.बदनाम केले जात आहे.वास्तविक गोटूल हे ज्ञानकेंद्र आहे.आदिवासी पंचायतीमध्ये सामूहिक निर्णय घेतले जातात.सामूहिकपणाची भावना आदिवासींमध्ये प्रबळ आहे. माझ्या साहित्यातून अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी लेखणीचा तलवार म्हणून वापर करते. पुस्तकी ज्ञानापेक्षा आजच्या महाविद्यालयीन तरूणांनी आदिवासी लोकसंस्कृती,भाषा, लोकजीवन इत्यादीचा अभ्यास करावा असा सल्ला शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे,उपाध्यक्ष श्री. तुकाराम काळे,कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे इ.नी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा.पोपटराव माने यांनी केले.प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे यांनी आभार मानले.

Previous articleमतदान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
Next articleनिसर्ग राजा मित्र जीवांचे’ संस्थेचा १३ वर्धापनदिन उत्साहात साजरा