नारायणगावात डॉ वर्षा गुंजाळ यांना राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणानंतर पहिल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा मान


किरण वाजगे

नारायणगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना विषाणूशी लढताना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका यांच्या वतीने वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर वर्षा गुंजाळ यांच्या हस्ते नुकतेच नूतनीकरण झालेल्या ऐतिहासिक राजा शिवछत्रपती प्रवेशद्वारावरील ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्ताने नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय इमारतींवर विद्युतरोषणाई, तिरंगी झेंड्याची रोषणाई, गावातील बाजारपेठेत तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट व राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराच्या बाहेरील रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली .


बसस्थानकासमोरील कुरेशी मार्केट समोर सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य सबनीस विद्यामंदिरात संचालक रत्नदीप भरवीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एनसीसी चा कॅडेट्सनी शानदार संचलन केले. तर गावातील इतर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनी गावातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाचा पंधराव्या वित्त आयोग या मार्फत विमा काढणार असल्याचे जाहीर केले. यानिमित्ताने नारायणगावातील कलाकारांनी राजा शिवछत्रपती प्रवेशद्वारावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये संजय रत्नपारखी, दत्ता जाधव, सुनील मेहेर, हमिद शेख, बाळू चव्हाण यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.


याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, बाळासाहेब पाटे, अशोक गांधी, संतोष वाजगे, रोहिदास भुजबळ, अनील दिवटे, अशिष माळवदकर, दिपक वारुळे, मंडलाधिकारी काळे भाऊसाहेब, तलाठी सैद भाऊसाहेब, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी यांनी केले तर सर्वांचे आभार उपसरपंच अरिफ आतार यांनी मानले.

Previous articleएमटीडीसी व‌ पराशर कृषी व संस्कृती पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने होम स्टे व महाभ्रमण योजने अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
Next articleपूर्व हवेलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा