“बाण” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते

राजगुरूनगर -७३व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोर्यातील सुळक्यांच्या विश्वात प्रस्तरारोहणासाठी सर्वाधिक कठीण सुळका म्हणून ओळख असणारा ७१० फूटी “बाण” सुळका टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताक दिनी सर करीत “भारत माताकी जय”, “वंदे मातरम” या घोषणा देत तिरंगा फडकाविला.

या मोहीमेची सुरवात साम्रद (ता. अकोले जि. नगर )येथून झाली. अडीच तासांची पायपीट बाण सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जाते.२५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवगर्जना देऊन प्रस्तरारोहणास सुरवात झाली. संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत ४२० फुट प्रस्तरारोहण करून तिसरे स्टेशन गाठले.प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्यास मानवंदना देऊन प्रस्तरारोहणास सुरवात झाली. उरलेले २९० फुट प्रस्तरारोहण करून दुपारी ४ वाजता शिखर गाठून तिरंगा फडकाविला.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ७१० फूटी अति कठीण श्रेणीतील प्रस्तरारोहण मार्ग, सुळक्याचे रांगडे रूप, छातीत धडकी भरावी असे सरळसोट कडे, कोणत्याही क्षणी कोसळणारे दगड, घोंघावणाऱ्या मध माश्यांची पोळे, पाण्याची प्रचंड कमतरता, कडाक्याची थंडी, अतिदुर्गम परिसर अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, विशाल बोडके आणि सहाय्यक संघात असणाऱ्या अर्चना गडधे, अक्षय ठाकरे, समीर देवरे, रोहित पगारे, मंदार चौधरी, महेश जाधव, सागर बांडे, ओंकार रौंधळ, हेमंत पाटील आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleफिरते पशुचिकित्सालयाचा (मोबाईल व्हॅन) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
Next articleसामाजिक बांधिलकीतून प्रजासत्ताक दिन साजरा